मुंबईत पदव्युत्तर शिक्षण घेत असताना इरावती कर्वे यांना मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक गोविंद सदाशिव घुर्ये यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयीन काळात रुजलेली ही गुरू-शिष्य नाळ पुढील आयुष्यात इरावतीबाईंच्या कार्यात ठायी ठायी उमटताना दिसते. भारतीय समाजाच्या अंतरंगाला समजून घेण्यासाठी कुटुंब, जात, धर्म आणि नातेसंबंधांचा सूक्ष्म अभ्यास करणे आवश्यक आहे, यावर दोघांचेही एकमत होते. केवळ अनुभवावर नव्हे, तर व्यापक सर्वेक्षणातून संकलित झालेल्या तथ्यांवर आधारित अभ्यासच खऱ्या अर्थाने समाजशास्त्रीय सत्य उलगडू शकतो, याचे भानही त्यांनी एकत्रितपणे जोपासले. घुर्ये यांच्या विचारांचा प्रभाव इरावतीबाईंच्या संपूर्ण शैक्षणिक व बौद्धिक प्रवासावर जाणवतो.
इरावतीबाई पारंपरिक ओरिएंटल इंडोलॉजिस्ट पद्धतीने संशोधन करत. त्यानुसार त्यांनी वर्तमानकाळाच्या विश्लेषणासाठी प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये झालेल्या लिखाणाचा सखोल अभ्यास केला आणि मानववंशशास्त्रातील सिद्धांतांचा उपयोग करून निष्कर्ष मांडले. भारतात दिसून येणारी विविधतेतील एकता आणि जातीव्यवस्था यांचे मूलस्वरूप मुख्यतः देशाच्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये दिसून येते, असे इरावतीबाईंचे मत होते. त्यांच्या मते प्राचीन ग्रंथांचा केवळ ऐतिहासिक संदर्भ नव्हता, तर तो भारतीय समाजशास्त्राचा आत्मा उलगडण्याचा एक जिवंत धागा होता.
समाजशास्त्रज्ञ नंदिनी सुंदर, यांनी इरावतीबाईंच्या जीवनचरित्राचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या मांडणीनुसार इरावतीबाईंच्या कार्यावर चार प्रमुख बौद्धिक पद्धती, तसेच परंपरांचा प्रचंड प्रभाव होता.
पहिली पद्धत - तात्विक (Philosophical) – इरावतीबाईंनी आपले मार्गदर्शक डॉ गोविंद सदाशिव घुर्ये यांच्याकडून आत्मसात केलेला तात्त्विक दृष्टिकोन आणि त्यावर आधारित संशोधन पद्धत इथे नमूद करता येईल. याचाच आधार घेऊन त्यांनी महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथाचे तात्त्विक दृष्टिकोनातून विवेचन करून ‘युगांत’ सारखे लेखन केले.
दुसरी पद्धत - वांशिक (Ethnological) – एथ्नोलॉजिकल परंपरा, जी इरावतीबाईंनी आपल्या संशोधन कार्यांसाठी केलेल्या विस्तृत सर्वेक्षणांमध्ये दिसून येते. यात मानवजातीचा अभ्यास, जन-संस्कृतीचा अभ्यास समाविष्ट आहे. भारतातील विविध लोकसमूहांचा (उदाहरणार्थ धनगर, नंदीवाले, इत्यादी) अभ्यास करण्यासाठी त्यांनी या पद्धतीचा अवलंब केला.
तिसरी पद्धत - शारीरिक मानववंशशास्त्र (Physical Anthropology) – जर्मन शारीरिक मानववंशशास्त्राची पद्धत. यामध्ये विविध लोकसमूहांतील गटांच्या मानवी उत्पत्तीचा मागोवा घेऊन त्यांच्या जनसूत्रांचा शास्त्रीयरीत्या शोध घेणे अपेक्षित असते. मानवी इतिहासाच्या गूढ गुंतागुंतीत शिरताना, इरावतीबाईंनी या पद्धतीचा उपयोग केवळ संशोधनाच्या साधनापुरता केला नाही, तर मानवी अस्तित्वाच्या खोल प्रवाहांचा वेध घेण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून केला. त्यांनी देशाच्या विविध भागातील आदिवासी, महार आणि इतर समूहांचे रक्तगट, शारीरिक मापे, कवटीचे मोजमाप घेऊन केलेले संशोधन या प्रकारात मोडते.
चौथी पद्धत - पुरातत्व, सामाजिक, आर्थिक (Archaeological, Social, Economical) – पुरातत्त्वशास्त्र, सामाजिक-आर्थिक संशोधन आणि अन्वेषणांवर आधारित कार्यप्रणाली. इरावतीबाईंनी प्रा. सांकलिया यांच्याबरोबर लांघणज येथील पुरातत्व संशोधनाचे कार्य या पद्धतीनुसार केले आहे. शहरीकरण, धरणग्रस्त भागातील लोकांच्या आयुष्यावर होणारे परिणाम इत्यादी विश्लेषणात्मक लेखन यात समाविष्ट होते.
इरावतीबाई आणि हसमुख सांकलिया आणि इरावती कर्वे, विद्यार्थ्यांसमवेत