भारतीय समाजव्यवस्थेचा, संस्कृतीचा अभ्यास करायचा तर जाती व्यवस्था, विवाहसंस्था आणि नातेसंबंध यांचा साकल्याने विचार होणे आवश्यक आहे.
या विचारातून इरावतीबाईंनी भारतातील विविध सामाजिक संस्थांचा, संरचनेचा अभ्यास केला. या अभ्यासाचे सार त्यांनी १९५३ मध्ये आपल्या ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ (Kinship Organization in India) या लिखाणात मांडले. सामाजिक अंगाने जाणारे मानववंशशास्त्र (Social Anthropology) लक्षात घेता, इरावतीबाईंचे हे लिखाण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संयुक्त कुटुंबसंस्था, ग्रामसंस्था आणि जाती व्यवस्था ही भारतीय समाजव्यवस्थेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, यातील एकत्र कुटुंबसंस्था आणि जातीव्यवस्था यांबाबत त्यांचे संशोधनपूर्ण लिखाण मूलभूत आणि मौलिक स्वरूपाचे आहे. इरावतीबाईंनी भारतातील विविध भागांतील लोकसमूहांचा अभ्यास केला, त्यातून भारतीय समाजात रूढ असलेले आप्तसंबंध समजून घेतले आणि त्याचे विश्लेषण भाषिक प्रदेशांशी जोडून त्यांतील विविधता मांडली.
क्रिस्टोफ फॉन फ्युरर-हैमेंडॉर्फ
१९५१ मध्ये लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (School of Oriental and African Studies - SOAS) मध्ये इरावती कर्वे यांना अतिथी व्याख्याता म्हणून आमंत्रित करण्यात आले. त्याच काळात क्रिस्टोफ फॉन फ्युरर-हैमेंडोर्फ या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञांशी त्यांची भेट झाली. त्यांच्या चर्चांमधून ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ (Kinship Organization in India) या ग्रंथाची संकल्पना आकारास आली. लंडनमध्ये असतानाच त्यांनी प्रागैतिहासाच्या ‘सकल आफ्रिकी काँग्रेस’ मध्ये भारत सरकारचे प्रतिनिधित्व केले. तिथे ‘रॉकफेलर फाउंडेशन’चे उपव्यवस्थापक चॅड्बोर्न गिलपॅट्रिक यांची भेट झाली. त्यांच्या कार्याची ओळख असल्याने इरावतीबाईंना पुढील संशोधनासाठी पॅरिस येथे बोलावण्यात आले आणि त्यांना रॉकफेलर फाउंडेशनचा निधी मिळाला. १९५१ मध्ये इरावतीबाई दोन महिन्यांसाठी अमेरिकेला गेल्या. त्यांनी न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को आणि शिकागो येथील विद्यापीठांना भेटी दिल्या आणि मानववंशशास्त्रावरील चर्चासत्रांमध्ये भाग घेतला.
इरावतीबाईंच्या निष्कर्षानुसार भारतीय समाजातील नातेसंबंध भौगोलिकदृष्ट्या चार प्रकारांत विभागले गेले आहेत. उत्तर भारतात इंडो-युरोपियन रचना अस्तित्वात आहे. यात गोत्र-पद्धती विवाहप्रथा, पितृसत्ताक समाजरचना, विवाहानंतर स्त्रीचे पतीच्या कुटुंबात स्थलांतर ही प्रमुख वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. दक्षिण भारतातील द्राविडी रचनेमध्ये क्रॉस कझिन मॅरेजेस (cross cousin marriages); म्हणजे मामा किंवा काका-मुलगा/मुलगी यांच्यात विवाह स्वीकारार्ह आहेत. स्त्रीचे विवाहानंतरही मूळ नातलगांमध्ये राहणे हेदेखील या रचनेचे वैशिष्ट्य आहे. मध्य भारतात मिश्र स्वरूप पाहायला मिळते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रासारख्या प्रदेशात गोत्र-पद्धती प्रचलित आहे. परंतु आते-मामे संबंधांतील विवाहही पाहायला मिळतात. आदिवासी व मुंडारी समाजात स्वतंत्र स्थानिक परंपरा आढळून येते. त्यांचा वैदिक किंवा आर्य परंपरेशी थेट संबंध दिसत नाही.
इरावतीबाईंच्या मते ‘संयुक्त कुटुंब’ म्हणजे एकत्र राहणाऱ्या व्यक्तींची समूहात्मक व्यवस्था. यात मिळकतीचा सामूहिक वापर व मालकी पाहायला मिळते. एकाच चुलीवर कुटुंबातील सर्वांसाठी अन्न शिजवले जाते. सामूहिक धार्मिक कर्मकांडे व पूजापद्धती या आधारांवर त्यांनी उत्तर व दक्षिण भारतातील कुटुंबांमधले भेद मांडले आहेत. इरावतीबाईंनी ऋग्वेद, महाभारत, संस्कृत आणि पाली ग्रंथांमधील नातेसंबंध दर्शवणाऱ्या संज्ञांचे शास्त्रीय विश्लेषण केले. तसेच, भारतीय भाषांमधील आधुनिक आप्तसंबंध संज्ञांचा तुलनात्मक अभ्यासही केला.
विवाहसंस्था, पितृसत्ताकता आणि स्त्रियांच्या स्थितीवरही इरावतीबाईंनी भाष्य केले. त्यांच्या मते, स्त्रियांना बालवयात पतीच्या घरी पाठवणे ही प्रथा केवळ कुटुंबरचनेची नव्हे, तर सामाजिक नियंत्रणाचे साधन आहे. त्या म्हणतात, विवाह ही केवळ वैयक्तिक घटना नसून, सामाजिक नियम व जातिव्यवस्थेचे कठोर पालन करणारी संस्था आहे. आपल्या प्रबंधात त्यांनी भारतीय समाजातील नातेसंबंध केवळ वर्णनात्मक पद्धतीने न मांडता, विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून मांडले आहेत. नातेसंबंध रचना ही केवळ कौटुंबिक घटना नसून, संपूर्ण सामाजिक रचनेचे प्रतिबिंब आहे, हे त्यांनी दाखवून दिले.
मानववंशशास्त्राचा अभ्यास म्हणजे, लोकांचा अभ्यास. हा लोकांमध्ये मिळून मिसळून राहूनच सुयोग्य रीतीने होतो. इरावतीबाईंच्या कार्यात ही कार्यप्रणाली पुरेपूर उतरली होती. १९५३ मध्ये महाराष्ट्रातील नंदीवाले लोकसमूहाचा अभ्यास करत असताना काही विद्यार्थ्यांना त्यांनी नंदीवाल्यांच्या एका समूहासोबत काही दिवस राहून अभ्यास करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी नंदीवाल्यांच्या प्रमुखाशी बोलणे सुरू केले. कुणाच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणार असे प्रमुखाने विचारता, विद्यार्थ्यांनी इरावतीबाईंचे नाव सांगितले. प्रमुखाने इरावतीबाईंना भेटून पुढे ठरवू, असा निरोप दिला.
नंदीवाल्यांचा निरोप समजताच इरावतीबाई नंदीवाले तंबू ठोकून राहत होते तेथे गेल्या. नंदीवाले दक्षिण भारतातून भटकंती करत महाराष्ट्रात येत. डुक्कर, ससे अशा प्राण्यांची शिकार करत, त्यांचे मांस खात. इरावतीबाई गेल्या तेव्हा तंबूच्या आसपास मांस कापल्याच्या खुणा आणि वास पसरला होता. नंदीवाल्यांच्या प्रमुखाने इरावतीबाईंची भेट घेतली. पाहुणचार म्हणून इरावतीबाई आणि सहकारी विद्यार्थ्यांना मांस देऊ केले. ते अर्धे कच्चे मांस कसे खावे, या विचाराने विद्यार्थी बुचकळ्यात पडले. मात्र इरावतीबाईंनी क्षणाचाही विलंब न करता अगत्याने देऊ केलेले मांस ग्रहण केले. त्याचा परिणाम असा झाला, की आपल्या समाजाप्रती खरेच आत्मीयतेने अभ्यास करण्याच्या इरावतीबाईंच्या प्रकल्पाचे त्यांनी स्वागत केले आणि विद्यार्थ्यांना समूहासोबत राहून अभ्यास करण्याची प्रमुखांनी अनुमती दिली. यातूनच पुढे मल्होत्रा या एका विद्यार्थ्याचा पीएचडी चा अभ्यास पूर्ण झाला आणि पुढे त्यांनी नंदीवाल्या लोकसमूहाबाबत शोधनिबंध आणि अनेक लेख लिहून प्रकाशित केले.
इरावतीबाईंनी जनमानसात वर्षानुवर्षे संशोधन केले. विविध जात-समूहाच्या लोकांमध्ये मिसळून, त्यांच्याबरोबर राहून आधी त्यांना स्वीकारले, आपलेसे केले, त्यामुळेच लोकसमूहांनीदेखील त्यांना सहकार्य केले. समाजशास्त्राची, सामाजिक स्वरूपाच्या कार्याची शिकवण इरावतीबाईंच्या कार्यप्रणालीत पुरेपूर उतरली होती. लोकसमूहांवर त्यांनी केलेल्या अभूतपूर्व संशोधन कार्याच्या यशाचे हे गमक म्हणता येईल.