१९५९ - १९६१ या काळात इरावतीबाई बर्कले विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणून दोन वर्षांसाठी कार्यरत होत्या. अमेरिकेत त्यांनी विविध संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आणि भारतीय समाजरचनेचे पश्चिमी मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले. या काळात ‘दक्षिण आशिया संवाद मंच’ यात त्यांनी केलेली भाषणे गाजली. त्यांच्याबरोबर काम करणारे डॉ. रामचंद्र मुटाटकर यांना एएफएमसी (AFMC - Armed Forces Medical College) येथे वैद्यकीय मानववंशशास्त्रावर व्याख्याने देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे श्रेय इरावतीबाईंना जाते. त्यातूनच भारतात वैद्यकीय मानववंशशास्त्राच्या अभ्यासाला अधिक वाव मिळाला.
अमेरिकेत काही काळ वास्तव्य करून भारतात परतल्यावर इरावतीबाईंच्या वडिलांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतून आणलेले महाभारताचे खंड त्यांना भेट दिले. इरावतीबाईंना ऐतिहासिक, सांकृतिक, पौराणिक साहित्यात रस होता. वेद, उपनिषदे यांचा अभ्यास होता. महाभारत या काव्यग्रंथाचा त्यांनी मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला आणि १९६७ मध्ये ‘युगांत’ या साहित्यकृतीचा जन्म झाला.
‘युगांत’ हे महाभारतावर आधारित लेखन करण्याआधी इरावतीबाईंनी काही लघुनिबंध लिहिले होते, जे त्यांच्या ‘परिपूर्ती’ आणि ‘भोवरा’ या पुस्तकांत आढळतात. कामाच्या अनुभवाने, चिंतनाने आणि अनुभूतीतून प्रकट होणाऱ्या या लघुनिबंधांची मांडणी सहज सोपी आहे. सत्यस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी, खोलात जाऊन अर्थ शोधण्यासाठी इरावतीबाई महाभारत, रामायण, पुराण यांचा आधार घेत.
‘युगांत’मध्ये इरावतीबाईंनी महाभारताचा मानववंशशास्त्रीय अभ्यास केला आहे. त्यात वर्णन केलेले व्यक्तिचित्रण, संस्कृतीचे दर्शन मानववंशशास्त्रातील सिद्धांतांच्या आधारावर आहे. महाभारताचा भारतातील विविध पंथांवर वेगवेगळा प्रभाव जाणवतो. बौद्धांना त्यातील उत्कृष्ट नैतिक संकल्पना भावते, तर जैन आणि मराठ्यांना कृष्णाची कथा आपलीशी वाटते. महाभारतावर आधारित ‘श्रीमद् भगवद् गीता’ हा भारतात आणि भारताबाहेरही सर्वाधिक वाचला जाणारा ग्रंथ आहे. महाभारतातील कथा आदिवासींमध्येही लोकप्रिय आहेत. त्यांनी लोककथांच्या शक्तिशाली पुरुषाचे आदर्श भीमाच्या रूपात पाहिले. म्हणूनच महाभारताचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आणि विविध पातळ्यांवर मतितार्थ आणि महत्त्व आहे.
इरावतीबाईंना तत्कालीन पिढीसाठी महाभारताचा अर्थ उलगडणे आवश्यक आहे, असे वाटले. महाभारतातील पात्रांचा अभ्यास करताना त्यामधील सामाजिक आणि वैयक्तिक संबंधांचा सुसंगत सिद्धांत त्यांना स्पष्टपणे जाणवला. हाच सिद्धांत सोप्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न इरावतीबाईंनी ‘युगांत’ या ग्रंथात केला आहे.
‘युगांत’ हे ललित साहित्य आहे, इरावतीबाईंनी त्यात महाभारताचे पुनर्कथन केले आहे. इतिहास, प्राचीन भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र यांचा उत्तम संगम असलेला समाजशास्त्रीय ग्रंथस्वरूपातील दस्तावेज अशा दृष्टीनेही ‘युगांत’ कडे पाहिले जाते. मानवाच्या गरजा व प्रतिक्रिया या भूतकाळात व आधुनिक काळात जवळपास सारख्याच भासतात, त्यांचे प्रतिबिंब यात दिसून येते. ‘युगांत’ च्या निमित्ताने इरावतीबाई समाजातील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नागरीकरणाच्या पैलूंचा समांतर अभ्यास करतात.
‘युगांत’ मध्ये इरावतीबाई महाभारतातील प्रत्येक पात्राची नैतिक पातळीवर चिकित्सा न करता सदर पात्रांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचे विश्लेषण करून विविध मानवी भावनांची (सकारात्मक व नकारात्मक) उकल करतात. त्यांच्या तटस्थ दृष्टिकोनातून केलेल्या मांडणीनुसार महाभारतातील मुख्य पात्रे पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नाहीत, तर त्यांच्यात चांगुलपणा आणि वाईटपणा यांचे मिश्रण आहे. इरावतीबाईंच्या मते, भीष्माचे संपूर्ण जीवन हे अति चांगुलपणा, कष्टी जीवन आणि निरर्थक बलिदानाचे उदाहरण आहे. राजनीतीच्या दृष्टिकोनातून भीष्माने घेतलेल्या भूमिका संयुक्तिक वाटत असल्या तरी, मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यावर बोट ठेवले जाऊ शकते. त्यांच्या मते, युधिष्ठिराचे धर्माचे निष्ठेने पालन आणि जुगाराच्या नादापायी आलेला कमकुवतपणा, तसेच कर्णाची उदारता या घटनाही दुःखद परिणामांना जन्म देतात. त्यामध्ये मानवी क्षमतेचा प्रचंड अपव्यय दिसतो. त्याचबरोबर कृष्णाने सुद्धा कर्णास द्रौपदीचे प्रलोभन दाखवले, हे स्त्रियांबाबत हीन दर्जाचे कृत्य आहे अशी भूमिका इरावतीबाई घेतात.
महाभारतातील सांस्कृतिक मूल्ये व वर्तन यांचे विश्लेषण मानववंशशास्त्राचे सिद्धांत वापरून ओघवत्या भाषेत इरावतीबाईंनी ‘युगांत’ मध्ये मांडले आहे.
इतर साहित्य
इरावतीबाईंच्या बहुतेक इंग्रजी ग्रंथांस आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून ‘युगांत’ या महाभारतावरील चिकित्सक ग्रंथास १९६८ मध्ये साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन यांचा पुरस्कार लाभला. महाराष्ट्रात हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या प्रथम महिला साहित्यिका होत. यांशिवाय त्यांनी इंग्रजी व मराठी नियतकालिकांतून स्फुट लेखनही केले. विविधांगी लेखनामुळे त्यांचा वाचकवर्ग विस्तृत होता. त्यांनी भारतातील लोकसंस्कृती, नगरे आणि खेडी, धर्म, कुटुंब, लोककथा आणि मिथक यांसारख्या विविध विषयांवर संशोधन करून लेखन केले. तसेच, मानवशास्त्र, समाजशास्त्र व मानसशास्त्र या विषयांत विपुल लेखन व संशोधन केले.
नरहर कुरुंदकर हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य विचारवंत आणि तल्लख विवेचक म्हणून ओळखले जातात. आणीबाणीनंतरच्या काळात महाराष्ट्राच्या वैचारिक नेतृत्वात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी ‘गंगाजल’ या लेखसंग्रहाला प्रस्तावना लिहिली असून, त्यात इरावती कर्वे यांच्या लेखनशैलीचा तौलनिक आढावा घेतला आहे. वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत अशा ललित लेखकांच्या लिखाणाची चर्चा करून, इरावती कर्वे यांचे लिखाण कशा प्रकारे वेगळे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
काही विषयांत मतभेद असले तरीही कुरुंदकरांनी इरावतीबाईंचे मोठेपण मान्य केले आहे. ‘मानलेल्या पुत्राची वैचारिक श्रद्धांजली’ असे वर्णन त्यांनी या प्रस्तावनेच्या शेवटी केले आहे. कुरुंदकरांनी इरावतीबाईंच्या व्यक्तिमत्वाचे तीन पातळ्यांवर विश्लेषण केले आहे: १. प्रापंचिक गृहिणी, २. समाजशास्त्रज्ञ व मानववंशशास्त्रज्ञ, ३. नवीन अनुभव टिपणारे संवेदनशील मन. “हे तीनपदरी मन इरावतीबाईंच्या लिखाणात एकसंध स्वरूपात प्रकट होते, त्यामुळे वाचक भारावून जातो,” असे कुरुंदकर म्हणतात.
इरावतीबाईंचे साहित्यिक कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, काही अभ्यासकांनी त्यावर टीका केली आहे. दुर्गा भागवत यांनी ‘आठवले तसे’ या निबंधाद्वारे इरावती कर्वे यांच्यावर चौफेर टीका केली. ‘प्लेइजिअरिझम्’ (वाङमयचौर्य), ‘मनिप्युलेइशन्’ (कुशलतेने हाताळणे / प्रभाव टाकणे), ‘करिअरिझम् (स्वकर्तृत्वाचा अतिरेकी उपयोग), ‘सप्रेशन’ (इतरांच्या विचारांना दडपणे) असे आरोप केले. मात्र, दुर्गा भागवत यांनी हा निबंध इरावतीबाईंच्या निधनानंतर प्रकाशित केला. त्यामुळे त्यांच्या आरोपांवर योग्य वेळी खुलासा होऊ शकला नाही आणि अभ्यासकांनी त्याला फारसे महत्त्व दिले नाही.
फ्रेंच मानववंशशास्त्रज्ञ लुई ड्यूमोंट यांनी इरावती कर्वे यांच्या ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ (Kinship Organization in India) या पुस्तकावर टीका केली. ड्यूमोंट यांच्या मते, कर्वे यांचा अभ्यास व्यापक नव्हता, कारण त्यांनी भारतात प्रत्यक्ष प्रवास न करता आपले संशोधन केले. त्यांच्या लिखाणात हिंदू धर्मशास्त्राचा योग्य विचार झालेला नाही, असे त्यांचे म्हणणे होते. ड्यूमोंट यांनी पुढे ‘होमो हायरारकिकस्’ (Homo Hierarchicus) हे संशोधनपर पुस्तक १९६६ मध्ये प्रकाशित केले. त्यांचे सिद्धांत शुद्ध व अशुद्ध या संकल्पनांवर आधारित होते. इरावतीबाईंचा दृष्टिकोन समाजशास्त्रीय आणि ऐतिहासिक स्वरूपाचा होता, त्यामुळे या दोघांच्या विचारसरणीत मूलभूत फरक होते.
इरावतीबाईंचे कार्य महाराष्ट्राच्या सामाजिक आणि बौद्धिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे आहे. टीका झाली असली तरी, त्यांच्या संशोधनाची ऐतिहासिक महत्ता अबाधित राहते. त्यांच्या लिखाणाचा समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून अभ्यास होणे आवश्यक आहे.