‘मराठी लोकांची संस्कृती’ हे इरावतीबाईंनी लिहिलेले पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचे सामाजिक, सांस्कृतिक अंगाने केलेले सखोल चित्रण होय. विश्लेषणात्मक स्वरूपाचे, वेगळ्या धाटणीचे हे पुस्तक विविध दाखले आणि संदर्भाने भरलेले आहे.
मुंबई साहित्य संघाकडून ‘कै. वामनराव जोशी स्मृती व्याख्यानमाले’ साठी ‘महाराष्ट्राची संस्कृती’ या विषयावर बोलण्यासाठी इरावतीबाईंना निमंत्रित केले होते. या व्याख्यानमालेतील भाषणांमधून ‘मराठी लोकांची संस्कृती’ हे पुस्तक साकारले. संस्कृतीचा अभ्यास म्हणजे मानवशास्त्राचा अभ्यास. संस्कृती ही केवळ मनुष्यप्राण्यालाच मिळालेली देणगी आहे. माणसाचे माणूसपण हे संस्कृतीत आहे. पुस्तकाची सुरुवात संस्कृतीच्या या व्याख्येने होते. इरावतीबाईंची संस्कृतीबाबत मांडणी पुढीलप्रमाणे आहे:
मनुष्यसमाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती आणि डोळ्यांना न दिसणारी, पण विचारांनी आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे ‘संस्कृती’. संस्कृती नेहमी परंपरागत आणि म्हणून दिक्काल निर्बंधित अशी असते. संस्कृती समाजाची असते, व्यक्तीमध्ये संस्कृती साकारते, जिवंत होते, नव्याने निर्माण होते किंवा लय पावते, पण कोणतीही व्यक्ती कोणत्याही संस्कृतीचे स्वरूप पूर्णत्वाने दाखवू शकत नाही. संस्कृतीला व्यक्तिनिरपेक्ष असे एक निराळेच स्वतंत्र जीवन असते. व्यक्ती जन्माला आल्यापासून परंपरागत वस्तुरूप संस्कृतीने वेढलेली आणि अव्यक्त पण दृढ अशा सामाजिक परंपरेमध्ये गुरफटलेली असते. व्यक्तीच्या जीवनविकासाच्या मर्यादा संस्कृतीच्या या दोन अंगांनी निश्चित केलेल्या असतात.
या पुस्तकात पुढे इरावतीबाई ‘मराठी लोकांचा पिंड’ या प्रकरणात शरीराची ठेवण, प्रमाणबद्धता, शारीरिक मोजमापे यांचा विचार करून महाराष्ट्रातील विविध जाती-जमातींची माहिती देतात. केसांचा रंग, पोत, शरीरावरील केसांचे प्रमाण, नाक-डोळ्यांची ठेवण या सर्वांचा अभ्यास त्यांनी केला आहे. प्रागैतिहासिक काळापासून येथे नांदलेले समाज आणि आज येथे असलेले समाज हे शारीरिकदृष्ट्या उत्तर-दक्षिण भारतीय समाजांची सरमिसळ दाखवतात.
सदर पुस्तकात ‘मराठी कुटुंब’ असे एक प्रकरण असून मराठी कुटुंबपद्धती ही पितृपरंपरेवर आधारलेली आहे, त्याचे बरेचसे साम्य उत्तर भारतीय स्वरूपाचे आहे असे नमूद केले आहे. महाराष्ट्रीय लोकांची कुलनावे ही झाडांवरून, प्राण्यांवरून, शारीरिक गुणांवरून, हुद्द्यांवरून, वतनांवरून घेतलेली दिसतात. संपूर्ण भारतभर देवकांची पद्धत असावी. कुळाचे देवक ते कुलनाव असावे आणि नंतर आडनाव पद्धती आली असावी. महाराष्ट्रातील कुटुंबपद्धती ही संस्कृती संघर्षाची आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जाती-जमातींचे मूळ हे उत्तर भारतीय असावे, परंतु कुटुंबपद्धतीवर दाक्षिणीय प्रभाव दिसतो. म्हणजेच उत्तर-दक्षिण याचा संगम महाराष्ट्रात दिसतो.
या पुस्तकातील शेवटचे प्रकरण हे ‘महाराष्ट्राची वसाहत व भाषा’ असे आहे. महाराष्ट्राची वसाहत ही पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे एका दिशेने झाली नसून कोकण व विदर्भातून ती पसरली असावी. महाराष्ट्राचा सांस्कृतिक गाभा हा गोदातीर असून तेथूनच संस्कृतोद्भव भाषा येथे रुजली असावी. शैव-वैष्णव यांचाही संगम महाराष्ट्रात पाहायला मिळतो. वारकरी संप्रदाय तर उच्चवर्णियांपेक्षा बहुजनांच्याच सहभागाने झालेला दिसतो. महाराष्ट्रात पुरुषाला जसे महत्त्व आहे तसेच स्त्रीलासुद्धा आहे. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांसारख्या पुरुष संतांचाही उल्लेख माऊली म्हणून होतो. जैनांचा १९वा तीर्थंकर मल्ली हा स्त्री होता, परंतु त्याचा उल्लेख मल्लीनाथ असाच होतो.
देव आणि देवळे
इरावतीबाईंची जडणघडण रँग्लर परांजपे यांच्या घरी झाली. परांजपे देवाला मानत नसत, ते निरीश्वरवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. इरावतीबाईंचे सासरे महर्षी कर्वे यांनी परंपरागत धार्मिक कर्मकांडांपेक्षा मानवतावाद आणि शिक्षणाला अधिक महत्त्व दिले. त्यांना पारंपरिक देवभक्त कदाचित म्हणता येणार नाही. त्यांचे पती दिनकर देखील देवाचे अस्तित्व मानणारे होते, असे म्हणता येत नाही. अशा कुटुंबातील सदस्य असलेल्या इरावतीबाईंचा देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराळा होता. त्यांची सश्रद्ध व डोळस दृष्टी त्यांच्या लिखाणात आढळून येते, त्याकडे एक कटाक्ष टाकूया :
“देऊळ हे एक श्रद्धास्थान आहे. आशा आकांक्षांचे प्रतीक आहे. देवळामध्ये अरूपाला रूप दिलेले असते. अनादीची प्राणप्रतिष्ठा केलेली असते; प्रसंगी अनंताचे विसर्जनही करतात. आपण जे नाही; पण ज्याच्या अस्तित्वाची आपणास जाणीव आहे, असे काहीतरी सत् म्हणून आहे. आपल्या आर्ततेत त्या सत् ला आपण निरनिराळी रूपे देतो, तोच देव.
जी मागणी मानवाजवळ करता येत नाही, ती आपण देवाकडे करतो. कायमचा आसरा मागतो, न्याय मागतो, निवारा मागतो, शांती मागतो किंवा प्रासंगिक मागण्या मागतो. अगदी काहीच नाही, तर संसाराच्या भगभगीमधून क्षणभराची उसंत मिळावी, म्हणून देवळात जातो. काहींना असा आधार नको असतो, काहींना असा आधार घ्यावा वाटतो. आपल्यापेक्षा सर्वस्वी श्रेष्ठ असे काही वाटते, त्याचे प्रतीक देऊळ. जगात पूर्णता असली, तरी काही उणे आहे असे वाटत असते आणि वाटत राहील. ते पूर्ण करायची जी इच्छा, तिचे प्रतीक देऊळ आहे.’’
पंढरपूर वारी
पंढरपूर वारी ही महाराष्ट्राची हजारो वर्षांची परंपरा आहे. मोठ्या संख्येने भक्त मंडळी (स्त्री, पुरुष, आबालवृद्ध) मूलभूत सुविधांचा बाऊ न करता एवढ्या मोठ्या संख्येने जवळपास महिनाभर पायी चालत पंढरपूरला जातात, या गोष्टीची विलक्षण ओढ वाटल्याने इरावतीबाईंनी पंधरा दिवस वारकऱ्यांसोबत पायी चालत वारी केली आणि वारीच्या अंतरंगात शिरून या समृद्ध परंपरेवर संशोधन केले. विविध प्रांतातून आलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र व इथला समाज संपूर्णत: समजून घ्यायचा असेल तर वारीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण पंढरीचा विठोबा हा इथल्या शेतकरी, कष्टकरी जनतेचे आराध्य दैवत आहे, याची त्यांना प्रचिती होती. म्हणूनच त्यांनी पंढरपूर वारीला महाराष्ट्राचा कुलधर्म म्हटले आहे.
पंढरपूर वारीबद्दल इरावती कर्वे यांचे काही विचार:
महाराष्ट्र म्हणजे पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा देश. महाराष्ट्रात क्वचितच एखादे गाव असेल, जिथून एकही व्यक्ती वारीला येत नाही. ‘वाटचाल’ या आपल्या पंढरपूर वारी विषयक लघुनिबंधात त्या आपला पंढरपूर वारीचा अनुभव कथन करतात.
तत्कालीन राजकीय परिस्थितीवरील भाष्य
इरावतीबाईंनी तत्कालीन समाजाची तुलना गोधडीशी केली. भारतीय समाज म्हणजे, जणू जे मिळाले, ते घेतले. काहीच टाकून दिले नाही. विविध समुदाय भारतीय समाजात वेळोवेळी लीलया समरस झाले. जशी गोधडी विविधरंगी तुकडे एका धाग्याने एकत्र जोडून तयार केली जाते, तत्सम भारतीय समाजही विविध जनसमुदाय असलेला एकसंध साचा म्हणून विकसित झाला. जरी अंतर्गत विविधांगी मतभेद आणि संघर्ष असले, तरी समाजाला एकत्र बांधून ठेवणारा एक धागा आहे, हे कालसापेक्ष समाजाकडे पाहिले तर लक्षात येते. इरावतीबाईंची ही मांडणी आजच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीतही संयुक्तिक वाटते, त्यातून आजही शिकण्यासारखे बरेच आहे.
इरावती कर्वे यांच्या ललित लेखनात विषयानुरूप तत्कालीन राजकीय परिस्थितीबाबत मत व्यक्त केलेले आढळते. परिपूर्ती पुस्तकात ‘एकेश्वरी पंथाचा विजय’ या लेखात नमूद केलेला परिच्छेद आजच्या काळात देखील तंतोतंत लागू पडतो, येथे तो नमूद केलाच पाहिजे –
“ ‘ला इलाहा इल्लीलाहा, मोहंमद रसुल्लीलाहा’ म्हणजे अल्ला एकच आहे आणि मोहंमद हा त्याचा प्रेषित आहे! काय भयंकर तत्वज्ञान! सबंध मानवतेच्या अंगी आज तेच विष भिनलेले आहे. अल्लाचा प्रेषित मोहंमद याचे जो ऐकत नाही तो मरणास योग्य आहे, त्याचा नायनाट झाला पाहिजे. हेच ब्रीदवाक्य आज सर्व पक्षांचे आहे. फक्त, ‘मोहंमद रसुल्लीलाहा’ ऐवजी ‘गांधी रसुल्लीलाहा’, ‘स्टालिन रसुल्लीलाहा’, ‘गोळवलकर रसुल्लीलाहा’ हे शब्द घातले म्हणजे झाले ! ह्या प्रेषितांच्या विरुद्ध एक शब्द कोणी बोलता कामा नये. ह्यांच्या चिन्हांचा कोणी अनादर करता कामा नये. प्रत्येकाने ह्यांच्यापैकी एकाच्या कुणाच्या तरी पंथात असलेच पाहिजे. गांधीवादी म्हणतात, ‘देशभक्त काय ते आम्हीच, इतर देशद्रोही आहेत, विनाशक आहेत, त्यांचा नायनाट केला पाहिजे.’ हेच शब्द स्टालिन आणि आर.एस.एस.वाले (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) वापरतात. माझ्यासारख्या अनेक-दैवतवादी हिंदू संस्कृतीत रुजलेल्या व ह्या वादाने भांबावलेल्या मनाला वाटते, एकाचाच आग्रह का ? सगळेच राहिनात ! कोणी कोणावर जुलूम केला नाही, म्हणजे झालं ! पक्षोपपक्षांची, जातीपातींची पर्वा न करता साधारण मानव्याची तरफदारी करणारे आता भारतात कुणी राहिले आहे का ? आधी माणुसकी आणि मग पक्षाचे राजकारण अशी वृत्ती ठेवणारे लोक गेले तर काय होईल? माझे अनेक-दैवतवादी मन परस्पर-सहिष्णुतेसाठी, साध्या माणुसकीसाठी हळहळते आहे.”
इरावतीबाईंना भारतीय समाजातील विविधतेचे प्रचंड कुतूहल आणि महत्त्व होते. त्या म्हणत, भूतलावरील कोणत्याही धर्माचा, वंशाचा, तसेच कोणतीही भाषा बोलणारा स्वत:स भारतीय म्हणवत असलेल्या माणसाचा भारत हा देश आहे. पुढे, १९६० साली, एका भाषणात इरावतीबाई म्हणतात –
“वंश, धर्म, जात या सर्व गोष्टी माणसांत परस्पर पूर्वग्रह निर्माण करतात. येणाऱ्या भविष्यकाळात ह्या गोष्टींमुळे वंशवादी भूमिका प्रबळ होऊन भावना अंधराष्ट्रीयतेत परिवर्तित होऊ शकतात. पण पुन्हा प्रखरपणे मी नमूद करेन : भारतीय हे संमिश्र (वेगवेगळ्या वंशाचे) आहेत, जे एकत्र आले आहेत आणि त्यांना आपले पूर्वग्रह कमी करून एकत्र राहायला शिकावे लागेल.”
सांप्रत भारतीय समाजाकडे आणि परस्पर आंतरधर्मीय भावनांकडे एक कटाक्ष टाकला तर वर उल्लेख केलेल्या वाक्याचे महत्त्व कळेल. भारतास स्वातंत्र्य मिळाले त्या काळातील इथल्या विविध धर्मीय समूहांत झालेल्या दंगली, हिंसा पाहून इरावतीबाई व्यथित झाल्या होत्या. भारतीय म्हणून त्यांना एक असा समाज अभिप्रेत होता, जो केवळ ‘हिंदू समाज’ किंवा ‘हिंदी समाज’ म्हणून उदयाला यावा असे नाही, परंतु एक बहुभाषिक, बहुसांस्कृतिक समाज म्हणून त्याची बांधणी व्हावी. या एकसंध समाजातील विविधांगी लोकसमूहांना एकमेकांच्या संस्कृतीबाबत जाण असेल, आदर असेल आणि एकत्रितरीत्या जे संघटित राहून, एकमेकांसमवेत काम करतील, जीवन व्यतीत करतील. वंश, भाषा, पेहराव आणि तत्सम गोष्टी वेगळ्या असल्या तरी हे फरक असण्याने विविध लोकसमूहांच्या समाजास एकसंध राहण्यात बाधा येऊ नये. भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात एका नियमाखाली समाजास आणण्याचा संघर्षात्मक प्रयत्न केवळ सत्ताकारण साधण्यासाठी होऊ शकेल. खचितच त्याबाबत त्यांना आकस होता. थोडक्यात, भारतासारख्या खंडप्राय देशात असणाऱ्या विविधतेतील एकता त्यांना अभिप्रेत होती, आणि त्यांनी त्याचा वेळोवेळी पुरस्कार केला.
कामानिमित्त इरावतीबाई ईशान्य भारतातल्या आसाममध्ये गेल्या, तेव्हा तत्कालीन राजकीय आणि एकंदरीत सामाजिक परिस्थिती पाहून व्यथित झाल्या. त्याबाबत ‘भोवरा’ या त्यांच्या पुस्तकातील ‘विनाशाची सुरुवात’ या लेखात वाचायला मिळते, ते असे :
“संस्कृती रक्षणाच्या नावे गारो लोकांमध्ये आसामी लोकांबद्दल द्वेष पसरवला जात आहे. हिंदी शिकणे व दिल्लीहून आलेल्या बड्या लोकांना ‘जन-गण-मन’ म्हणून दाखवणे आणि आपल्या लोक-नृत्यांचे प्रदर्शन करणे, हा सर्व टेकड्यांवरील प्रदेशांतून ठराविक कार्यक्रम होऊन बसला आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रेचे खोरे, खासी टेकड्या, गारो टेकड्या, लुशाई टेकड्या आणि इतर काही विभाग असे निरनिराळे विभाग पडलेले आहेत. प्रत्येकजण आपल्याला दुसऱ्यापासून वेगळा समजतो आणि ह्या वेगळेपणाच्या जाणिवेची जोपासना मिशनरी, परकीय समाजशास्त्रज्ञ व अधिकारीवर्ग मोठ्या कसोशीने करत आहेत. तीन कोटींचा महाराष्ट्र वेगळा झाला, तर जणू हिंदुस्थान रसातळाला जाईल अशी भाषा बोलणारे लोक पूर्व सरहद्दीवर असलेल्या ह्या चिमुकल्या आसामचे तुकडे तुकडे करीत आहेत, हे पाहून आश्चर्य आणि उद्वेग वाटला.’’
आसाम आणि एकूणच ईशान्य भारतात कालांतराने काय झाले, आजची तेथील संवेदनशील परिस्थिती पाहता, तिथे विनाशाची सुरुवात झाली आहे, हे द्रष्टेपणाने इरावतीबाईंनी कितीतरी आधीच नमूद केले होते.