इरावती कर्वे यांच्या सखोल अभ्यासातून निर्माण झालेला ‘हिंदू समाज – एक विवेचन / अन्वयार्थ’ (डेक्कन कॉलेज, १९६१) हा ग्रंथ म्हणजे महाराष्ट्रातील समाजरचनेच्या प्रारूपाबद्दल महत्त्वपूर्ण विवेचन होय. या संशोधनपूर्ण लिखाणात त्यांनी तत्कालीन भारतीय सामाजिक परिस्थितीवर भाष्य केल्याचे आढळते. जाती-जमातींविषयीचे आरक्षणाचे धोरण, हिंदू विवाह कायदा, भाषाविषयक प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मकतेबाबत विवेचन त्यांनी केले आहे.
हिंदू समाजावरील हा अभ्यास इरावतीबाईंच्या क्षेत्रीय दौर्यांमधून गोळा केलेल्या माहितीवर आणि हिंदी, मराठी, संस्कृत, पाली, तसेच प्राकृत भाषांतील संबंधित ग्रंथांच्या अभ्यासावर आधारित आहे. या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेच्या आर्यपूर्व अस्तित्वावर चर्चा केली आणि तिच्या सध्याच्या स्वरूपापर्यंतच्या विकासाचा मागोवा घेतला आहे. आरक्षण जातीव्यवस्थेवरून न करता आर्थिक निकषांवर असायला हवे, ही भूमिका इरावतीबाईंनी त्या काळात घेतली होती. सामाजिक निकषांवर आरक्षण केले तर जातीनिष्ठ एकत्रीकरण होऊन नकळत त्यातून अलगपणा कायम राहतो. राष्ट्रीय एकात्मतेस तो मारक ठरू शकतो, असे त्यांचे स्पष्ट मत होते.
इरावतीबाईंच्या मते, “हिंदू धर्म हा विविध जातींत विभाजित झालेला आहे. प्रत्येक घटकाची स्वतःची पारंपरिक वागणुकीची एक विशिष्ट पद्धत आहे. त्यामुळे भारतीय समाजात वेगवेगळ्या प्रकारचे वर्तन आणि नियम आढळून येतात.” इरावतीबाईंनी आपल्या हिंदू समाजावरील पुस्तकाची सुरुवात या समाजात आढळणाऱ्या गुंतागुंतीच्या नमुन्यांची नोंद घेऊन केली आहे. त्यांनी जातीला एक ‘आपापसात विवाह करणारा गट’ (Endogamous Kinship Group) असे म्हटले आहे.
जातीय समाजाच्या संरचनात्मक वैशिष्ट्यांवर चर्चा करताना, इरावती म्हणतात की हिंदू समाज ‘अत्यंत लवचिक’ आहे. सर्व जाती एकमेकांपासून वेगळ्या आहेत. प्रत्येक जातीचे स्वतःचे जवळजवळ स्वतंत्र संघटन आणि स्वत:चे खास अस्तित्व आहे. कोणत्याही स्वरूपाचे ठोस असे मूल्यांकनाचे मानक नसल्याने मूळ भारतीय स्वभावात असलेली सहिष्णुता, विविधतेतील ऐक्य जोपासणारी भावना यांचे प्रकटीकरण हिंदूंमध्ये होते.
हिंदू समाजात विविध सामुदायिक गटांनी ठराविक व्यवसाय स्वीकारले. प्रत्येक गटाने स्वीकारलेले व्यवसाय हे त्या विभाजनाचे प्रमुख कारण आहे. इरावतीबाईंच्या मते ‘महाराष्ट्रीय ब्राम्हण’ हा मोठा समूह असून, ‘चित्पावन ब्राम्हण’ हा त्या समूहातून वेगळा झालेला लहान समूह, म्हणजेच जात म्हणून उदयास आला. त्यांच्या मते, याचे प्रमुख कारण म्हणजे चित्पावन, कर्हाडे, सारस्वत, देशस्थ, ऋग्वेदी आणि माध्यंदिन ब्राह्मण यांच्यात त्या काळी अंतर्विवाह होत नव्हते, त्यांच्यात विवाहाच्या वेगवेगळ्या नियमावली होत्या आणि ते वांशिक दृष्ट्या एकमेकांपासून भिन्न होते.
सर्वसाधारणपणे एकच नाव धारण करणाऱ्या एका अंतर्विवाही गटास आपण जात म्हणून संबोधतो. जसे, कुंभार, ब्राम्हण, मराठा या जाती म्हणून आपण पाहतो, पण त्या जातींत विविध अंतर्गत अंतर्विवाही गट असतात. उदाहरणार्थ, कुंभार समाजात थोरचाके, लहानचाके, हातघडे, इत्यादी पोटजाती आहेत. या अंतर्विवाही गटांना सहसा पोटजात असलेले समूह म्हणून ओळखले जाते. त्यांच्यातील अंतर्विवाही संबंधांत वर आणि वधू यांच्या कुटुंबांतील आधीचे नाते-संबंध महत्त्वाचे ठरतात. अंतर्विवाही पद्धतीमुळे हा गट व्यापकरीत्या एकसंध राहण्यास मदत होते.
इरावतीबाईंनी या अंतर्विवाही गटांना, पोटजातींच्या लोकसमूहांना एका जातीचे लोक मानण्यात यावे, अशी मांडणी केली. कारण त्यांच्या निरीक्षणानुसार मोठ्या अंतर्विवाही गटाच्या चालीरीती कमी-अधिक प्रमाणात भिन्न असतात. कूळ आणि गोत्र या संकल्पनांना इरावतीबाईंनी बहिर्विवाही गट असे मानले. जातीची ही नवी व्याख्या व्यावहारिक दृष्ट्या सहज आणि समजावयास सोपी आहे. सामाजिक शास्त्रात ती आता रूढ होत आहे. जातीविषयक संशोधनात, ‘जात म्हणजे एक विस्तारित नातेसंबंध असणारा समूह’ हा नूतन विचार इरावतीबाईंनी प्रथम मांडला.
महाराष्ट्राचे उदाहरण घेऊन त्यांनी जातींबाबतची मांडलेली प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रकारे : १. जाती या अंतर्विवाही गट असतात. २. एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात जातींचा विस्तार असतो. ३. जातींतील व्यक्तींची परंपरेने ठरवून दिलेली वागणूक असते. बऱ्याचदा जातीतील वयस्कर मंडळींचा गट जात-पंचायत द्वारे या वागणुकीचे नियंत्रण करतो. ४. वेगवेगळ्या जाती एकाच ठिकाणी राहतात. पण त्या एकमेकांच्या व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करत नाहीत. क्वचित प्रसंगी एकमेकांत मिसळतात. ६. प्रत्येक जातीस साधारणत: एक पारंपरिक व्यवसाय असतो, पण तो केवळ त्यांचाच व्यवसाय असू शकत नाही. ८. जातींना सामाजिक उतरंडीवर विशिष्ट स्थान असते.
आजपासून सहा-सात दशके आधीच इरावतीबाईंना उमगले होते, की भारतापुढील सांस्कृतिक समस्या प्रदेश, जात आणि कुटुंब यांभोवती फिरत आहेत. भारतासारख्या बहुविध देशात एक समान भाषा विकसित करणे, समान नागरी कायदा लागू करणे आणि जातीव्यवस्था नष्ट करणे कठीण आहे. त्यांच्या मते, भारतीय उपखंडाला एकसंध करण्यासाठी समानतेचा आग्रह धरल्यास जुन्या जीवनशैलीतील मौल्यवान सांस्कृतिक वैशिष्ट्ये नष्ट होऊ शकतात. ही वैशिष्ट्ये भारतीय संस्कृतीची उपजत सहिष्णुता आणि विविधतेच्या जाणीवेचे यथार्थ प्रतीक आहेत.