इरावती कर्वे यांचा जन्म १५ डिसेंबर १९०५ रोजी ब्रह्मदेशातील (आताचा म्यानमार) म्यिंज्यान (Mingyan) येथे झाला. ब्रह्मदेशात ‘इरावड्डी’ नावाची मोठी नदी असून, म्यिंज्यान हे शहर त्या नदीच्या काठावर वसलेले आहे. त्या नदीवरूनच आई-वडिलांनी मुलीचे नाव ‘इरावती’ ठेवले. अखंड भारताच्या संकल्पनेनुसार, पूर्व हिमालयात उगम पावून ब्रह्मदेशात वाहणारी इरावड्डी नदी भारताची पूर्व सीमा मानली जात असे. हिंदू धर्माशीही या नदीचा प्राचीन काळापासून संबंध आहे. व्यासांनी लिहिलेल्या वराहपुराणात ही नदी भारतवर्षातील पवित्र नद्यांमध्ये गणली गेली आहे.
इरावती यांचे वडील गणेश हरी करमरकर, जन्माने चित्पावन ब्राह्मण, पुण्यातील पौड गावचे. इंग्रजांच्या ब्रिटीश बर्मा कॉटन कंपनीत काम मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासह ते म्यानमार येथे स्थायिक झाले. करमरकर यांच्या पत्नीचे नाव भागीरथी. ब्रह्मदेशात स्थलांतर केले तेव्हा त्यांना चार मुले होती - शंकर, प्रभाकर, महेश आणि हेमंत. कुटुंब म्यानमारमध्ये असताना इरावतीचा जन्म झाला. करमरकरांचे घर मराठमोळे असले, तरी आजूबाजूला संमिश्र संस्कृती होती. तिथली माणसे, भाषा, संस्कृती सगळेच वेगळे होते. भागीरथीबाईंना लिहिता-वाचता येत नव्हते. नव्या देशात त्यांना एकटेपणा प्रकर्षाने जाणवायचा. करमरकरांनी त्यांना मराठी आणि इंग्रजी शिकवायला सुरुवात केली आणि भागीरथीबाई नव्या वातावरणात हळूहळू रुळल्या.
इरावती जन्मापासूनच आई-वडिलांची आणि मोठ्या भावांची लाडकी होती. तिला जे हवे ते आई-वडील आनंदाने देत असत. म्यानमारमधील हा बालपणीचा काळ इरावतीसाठी स्वप्नवत होता. तिच्या जन्मानंतर वडिलांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारत गेली आणि ते कंपनीच्या उच्च पदावर पोहोचले. करमरकरांचे टेकडीवर दुमजली आलिशान घर होते. सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या. करमरकर कुटुंब अतिशय समाधानी होते. भागीरथीबाई लिहू-वाचू तर लागल्याच होत्या, परंतु इंग्रजीही बोलू लागल्या होत्या.
इरावती लहानपणापासूनच चौकस बुद्धीची होती. मोठ्या भावांच्या संगतीने वाढणाऱ्या इरावतीला शिकण्याची ओढ होती. त्या काळी म्यानमारमध्ये शिक्षणाची चांगली सोय नव्हती. इंग्रजी माध्यमाच्या शाळा लहान गावांतून नव्हत्या. आर्थिक परिस्थिती चांगली असलेले कर्मचारी आपल्या मुलांना हिंदुस्थानात शिकण्यासाठी पाठवत. करमरकरांनीही तेच केले. त्यांनी शिक्षणासाठी इरावतीला पुण्याला पाठवण्याचा निर्णय घेतला. बालपणीची सहा वर्षे म्यानमारमध्ये आई-वडिलांसोबत घालवलेली लहान इरावती अवघ्या सहाव्या वर्षी घर, नदी, आईचा मायेचा स्पर्श सोडून १९११ साली पुण्याच्या हुजूरपागा शाळेत दाखल झाली.
इरावतीला सर्वच वातावरण नवीन होते. नवीन मैत्रिणींबरोबर जुळवून घ्यायला वेळ लागत होता. बराच काळ ती एकटीच वसतिगृहाच्या आवारात बसत असे. इरावतीच्या वर्गात शकुंतला नावाची मुलगी होती. प्रसिद्ध गणितज्ञ आणि फर्ग्युसन कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे (रँग्लर परांजपे) यांची ती कन्या. रँग्लर परांजपे यांनी इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातून ट्रायपॉस ही अत्यंत कठीण गणितीय परीक्षा दिली आणि त्यात प्रथम क्रमांक मिळवला. या यशामुळे त्यांना ‘सीनियर रँग्लर’ हा सन्मान प्राप्त झाला आणि पुढे ‘रँग्लर परांजपे’ म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
एकदा रँग्लर परांजपे यांनी एकटीच बागेत बसलेल्या इरावतीला पाहिले. त्यांनी आस्थेने तिची चौकशी केली. वयाच्या सातव्या वर्षी, आई-वडिलांपासून दूर, पुण्यात बोर्डिंगमध्ये इरावती शिक्षण घेत आहे हे परांजपे यांना समजले. त्यांनी पत्नी सई यांच्यासमोर विषय काढला. इरावती एवढ्या लहान वयात एकटी राहते, तेव्हा तिला आपल्या घरी घेऊन यावे असा विचार त्यांनी बोलून दाखवला. शकुंतला आणि इरावती एकत्र वाढतील या भावनेने दाम्पत्याने इरावतीला घरी घेऊन येण्याचे ठरवले. परांजपे यांनी आपला मानस शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर व्यक्त केला. रँग्लर परांजप्यांना समाजात मोठा मान होता. मुख्याध्यापक त्यांच्या शब्दाबाहेर जाणे शक्य नव्हते. त्यांनी इरावतीचे वडील करमरकर यांचा पत्ता परांजपे यांना दिला.
इरावतीला आपल्या घरी, आपल्या मुलीसारखी वाढवण्याचा आपला मानस परांजपे यांनी करमरकर कुटुंबाला कळवला. त्यांची ख्याती सर्वश्रुत असल्याने करमरकरांनी फारसे आढेवेढे न घेता हा प्रस्ताव मान्य केला. त्यांच्या संमतीने, इरावती पुढील शिक्षणासाठी परांजपे कुटुंबासोबत राहू लागली. इरावतीच्या जीवनातील एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.
रँग्लर परांजपे यांचे घर म्हणजे विद्वत्तेचे आणि आधुनिक विचारांचे माहेरघर होते. कुटुंबातील वातावरण अत्यंत सुसंस्कृत, आधुनिक आणि वाङ्मयीन अभिरुचीला पोषक असे होते. परांजपे नास्तिक होते, तरीही त्यांच्या घरात श्लोक पठण चालायचे, इंग्रजी साहित्याचे वाचनही कुटुंबीय आवडीने करत. परांजपे यांच्या इंग्रजी साहित्यातील अभिरुचीमुळे इरावतीलाही इंग्रजी वाचनाची गोडी लागली. सईताईंना लहान मुले फार प्रिय होती. त्यामुळे त्यांच्याशी इरावतीचे जिव्हाळ्याचे नाते जडले आणि ती सहजपणे या कुटुंबात रुळली.
रँग्लर परांजपे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा इरावतीवर खोलवर प्रभाव पडू लागला. सुरुवातीला तिला त्यांचा धाक वाटत असे. हळूहळू त्यांच्या विचारसरणीचे विविध पैलू तिला समजू लागले आणि इरावतीच्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. इरावती आणि परांजपे यांच्यामध्ये पिता-पुत्रीचे नाते निर्माण झाले. इरावती त्यांना अप्पा म्हणूनच हाक मारू लागली. सईताईंचा स्वभाव अतिशय मनमोकळा होता. इरावती आणि शकुंतला त्यांच्याकडून स्वयंपाकाचे आणि घरकामाचे धडे घेऊ लागल्या.
पुण्यात त्या सुमारास राजकीय आणि सामाजिक हालचालींना वेग आला होता. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य असताना परांजपे यांनी परदेशी वस्त्रांची होळी केल्याबद्दल, विद्यार्थीदशेत असलेल्या विनायक सावरकरांवर नियमभंगाची कारवाई केली होती. परांजपे यांच्या घरी येणाऱ्या विचारवंत, न्यायाधीश, समाजसुधारकांशी झालेल्या संवादातून इरावतीच्या ज्ञानाला दिशा मिळत गेली. त्यांचे जवळचे मित्र बाळकराम हे न्यायाधीश होते. त्यांच्याबरोबर संवाद साधताना इरावतीला समाजशास्त्र (Sociology) आणि मानववंशशास्त्र (Anthropology) या विषयांची गोडी लागली.