भाषा
स्वातंत्र्योत्तर भारतात भाषावार प्रांतरचना झाली. त्यातून काही प्रश्न निर्माण झाले. जसे, प्रशासनात आणि शिक्षणात भाषेची नेमकी भूमिका काय असायला हवी? वेगवेगळ्या राज्यांची, तसेच राज्य-केंद्र स्तरीय संवादाची भाषा काय असावी? भाषेच्या प्रश्नावर सांस्कृतिक व भावनात्मक प्रश्न काय आहेत?
याच काळात हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा किंवा राजभाषा आहे, असे धोरण राष्ट्रीय समितीने घोषित केले. दक्षिणेतील राज्यांनी, खास करून तामिळी भाषकांनी त्यास प्रचंड विरोध केला. हिंदी विरोधी आंदोलनांमध्ये काहींनी प्राणही गमावले. त्यावेळी इरावतीबाईंनी पुढील भूमिका मांडली :
“इंग्रजी ही कोणत्याही राज्याची मातृभाषा नसल्याने दुजाभाव होण्याची शक्यता कमी आहे, म्हणून ती केंद्राची भाषा म्हणून राहू शकते. प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण मात्र पूर्णतः मातृभाषेत देण्यात यावे. इंग्रजी शिक्षण माध्यम म्हणून शिक्षणासाठी सुरुवातीपासून स्वीकारले, तर विद्यार्थी आपल्या संस्कृतीपासून दूर जाण्याची शक्यता असेल. परिणामी सांस्कृतिक मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये न रुजता न्यूनगंडाची भावना बळावू शकेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे, म्हणून प्रत्यके राज्यात निवासी शाळा असाव्यात.”
हिन्दू सिव्हिल कोड
इरावतीबाईंचे मत होते की, हिंदू सिव्हिल कोडमुळे लोकांच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रथांमध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. ही संहिता धर्मशास्त्रांवर आधारित आहे. या संहितेमुळे वाद स्थानिक ग्रामपंचायत स्तरावर सोडवण्याऐवजी थेट न्यायालयात नेले जात आहेत. त्यांच्या दृष्टीने, समान नागरी कायद्याच्या संदर्भात हिंदू समाजातील प्रादेशिक व सांस्कृतिक विविधतेकडे दुर्लक्ष होण्याचा धोका आहे. जिथे वैविध्य आहे तिथे एकसारखेपणाची जबरदस्ती केल्यास भारतीय समाजाच्या समृद्ध विविधतेला धक्का बसू शकतो, असा इरावतीबाईंचा दृष्टिकोन होता. त्यामुळे, हिंदू सिव्हिल कोडसारख्या कायदेशीर सुधारणा करताना प्रादेशिक भिन्नतेची समजूत राखली जावी आणि त्या विविधतेचा आदर केला जावा, असे त्यांनी ठामपणे प्रतिपादित केले. संपूर्ण बदल करण्याऐवजी, विद्यमान प्रथांमध्ये सुधारणा करावी आणि सामाजिक समस्यांवर उपाय शोधताना स्थानिक विविधतेचा सन्मान करावा, अशी त्यांची स्पष्ट सूचना होती.
स्त्री-वादी दृष्टिकोन
ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या पट्रीशिआ उबेरॉय यांनी भारतात जवळपास चार दशके काम केले. इरावतीबाईंचे ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ (Kinship Organization in India) हे लिखाण त्यांनी तांत्रिकरीत्या अभ्यासले. त्यांनी इरावतीबाईंना भारतीय कुटुंब व्यवस्थेविषयी ‘स्वदेशी ‘स्त्रीवादी’ दृष्टिकोनाची प्रवर्तक’ म्हणून संबोधले. इरावतीबाईंनी कुटुंबजीवनातील आधुनिक बदलांचा, महिलांच्या जीवनावर होणाऱ्या संभाव्य परिणामांच्या दृष्टिकोनातूनही आढावा घेतला. भारतीय महिलांच्या संभाव्य स्थितीबाबत लिहिलेल्या निबंधाची चिकित्सा केली. त्यातून त्यांच्या महिलांप्रती असलेल्या सहानुभूतीचा प्रत्यय येतो. इरावतीबाईंनी महिलांच्या रोजगार आणि शिक्षणासंदर्भातील दीर्घकालीन प्रवृत्तींचे विश्लेषण केले आहे. ‘युगांत’ या महाभारतावर आधारित ललित लेखांतही त्यांनी समाजाला महिलांच्या दृष्टिकोनातून आत्मपरीक्षण करावे, असे सूचित केले. ‘युगांत’मध्ये त्या कुंतीचे, गांधारीचे दु:ख अधोरेखित करतात. स्वत: ब्रह्मचर्याचे पालन करून वंश वृद्धिंगत व्हावा, म्हणून भीष्माने विविध प्रदेशांतील राजकन्यांना त्यांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने आपल्या कुटुंबातील राजकुमारांशी लग्न करण्यास भाग पाडल्याबद्दल इरावतीबाईंनी सखोल विश्लेषण व टीका केली. सीतेला अग्निपरीक्षा देण्यास भाग पाडल्याबाबत त्यांनी रामावर देखील टीका केली. इतकेच नव्हे, तर राम देव म्हणून का बरे मानावा असा प्रश्न आपल्या लेखनातून उपस्थित केला.
इरावतीबाईंची महिलांबद्दलची कल्पना ही आधुनिकवादी होती. पुरुषप्रधान संस्कृतीशी लढणाऱ्या स्त्रियांना संबोधताना त्या म्हणत, ‘स्त्रियांनी पुरुषांशी लढताना केवळ समान हक्कांसाठी न लढता नेहमी अधिक हक्कांसाढी लढावे.’ इरावतीबाईंनी १९५२ मध्ये पुण्यातील पहिली महिला दुचाकी चालक म्हणून प्रतिष्ठा मिळविली. त्यांच्या लेखनातून स्त्रीवादी दृष्टिकोन प्रतीत होत असला, तरी त्यांनी स्वत:ला कधी स्त्रीवादी समजले नाही. त्यांच्या विचारांत आणि लिखाणांत बरेचदा स्त्रीवादी दृष्टिकोन ओघाने येत राहतो. एकदा केदारनाथ यात्रा करत असताना इरावतीबाईंना विधवा महिलांचा एक चमू आपापसांत गप्पा मारण्यात मश्गुल दिसला. त्यांचे खुलून हसणे पाहून इरावतीबाई मनोमन सुखावल्या, असे त्यांनी लिहिले आहे, कारण त्यांना तत्कालीन महाराष्ट्रातील विधवा महिलांची दारूण अवस्था आठवली. कुठलेही स्वातंत्र्य नसलेल्या, केशवपन करून, एक वेळचेच अन्न ग्रहण करून, चार भिंतींत उर्वरित आयुष्य काढणाऱ्या तत्कालीन महाराष्ट्रातील विधवा महिलांना ‘चालते फिरते शव’ म्हणू शकू इतकी त्यांची वाईट अवस्था होती. इरावतीबाईंनी वेळोवेळी त्याबाबत चीड व्यक्त केली आहे.
स्त्रीवादी चळवळीत प्रत्यक्षपणे सामील न होता, तसेच स्त्रियांच्या प्रश्नांबाबत औपचारिकपणे भूमिका न घेताही इरावतीबाईंच्या लिखाणातून सामाजिक संरचना, विवाह प्रथा आणि वारसा प्रणाली यांतील महिलांची तत्कालीन स्थिती प्रकट झाली. त्यांनी मांडलेल्या दृष्टिकोनातून स्त्री–पुरुष समानतेच्या चर्चांना नवीन आयाम मिळाले.