इरावतीबाईंनी आपल्या संशोधन कार्यासाठी महाराष्ट्रात खेडोपाडी भ्रमंती केली, विविध जातीच्या समुदाय अभ्यासासाठी खेडोपाडी वास्तव्य केले, त्यांच्या चालीरीती, परंपरा समजून घेतल्या. त्याचबरोबर, शास्त्रीय अंगाने त्यांनी विविध जात-समूहाच्या, वांशिकतेने भिन्न असलेल्या माणसांच्या डोक्यांची मोजमापे घेतली, रक्तगट तपासले. त्यातून मानववंशशास्त्र अभ्यासक आणि शास्त्रज्ञ म्हणून इरावतीबाईंची महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक जातीतील समुदायाबाबतची समज फार पक्की झाली. त्यांच्या लिखाणातून पानोपानी ते उमगते.
महाराष्ट्रातील महार
महार जातीतील समुदायाचे यथोचित वर्णन ‘महार आणि महाराष्ट्र’ या आपल्या लेखात इरावतीबाईंनी केले आहे. त्यातून तत्कालीन महार समुदायाच्या परिस्थितीचे सखोल आणि समर्पक आकलन होते. सदर लेख इरावतीबाईंच्या ‘परिपूर्ती’ या पुस्तकात वाचायला मिळतो. त्यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :
महार भटके नसून ते आपापल्या गावचे पिढीजात रहिवासी असतात. त्यांच्या नावे जमिनी वगैरे फार आधीपासून नव्हत्या आणि असल्या तरी निकृष्ट दर्जाच्या आणि कमी असत. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह हा नेहमीच गावातील इतर समुदायांवर अवलंबून असे. त्यांना जमिनीतून पोटासाठी काढायचे नसते, तर मोठ्या मिनतवारीने त्यांना कोर-अर्धा कोर भाकर इतर समुदायांकडून काढायची असते.
घरात साठवण करता येईल एवढे कधीच महार लोकांना मिळत नाही, इतके त्यांचे पोट हातावर असते. पडेल ते जनावर ओढायचे, गावचे निरोप घेऊन जायचे, पाटलाच्या मागे राहायचे, गावात गस्त घालायची, अशी पडेल ती कामे महार करत. कुठल्या एकाच कामाने किंवा उद्योगाने पोट भरणे अशक्य म्हणून ते हजार उद्योग करत.
एखादा ब्राम्हण आज चार पैसे मिळाले, तर त्यातले दोन पैसे मागे ठेवेल, महार मात्र आज सर्वच्या सर्व खर्च करील आणि उद्या पोटासाठी परत वणवण करील.
हरिजन हा शब्द महारांना खटकतो, त्या शब्दात करुणा आहे, खोटी दया आहे असे त्यांना वाटते. त्यापेक्षा महार म्हणवण्यात त्यांना संकोच वाटत नाही.
महारांना माणसा-माणसांच्या संबंधांचे उपजत ज्ञान असते, आधीच्या, तसेच चालू पिढ्या वगैरे, तसेच राहत्या गावची खडानखडा माहिती महारांकडे असे. गावातली सगळी बिंगे, सगळ्या भानगडी, घरगुती कटकटी यांची महार म्हणजे एक चालतीबोलती नोंदवहीच! चौकसपणा, हजरबाबीपणा महारांच्या ठायी रुजलेला असल्याने गावात कुणाचे जमीन किंवा तत्सम काही भांडण निघाले, तर त्यात महारांची साक्ष असायची.
महारांची बुद्धी लवचिक आणि चंचल असते, नवे चटकन उचलण्याची त्यांच्यात क्षमता असते. त्यांना गाणे, नाचणे, नक्कल फार छान जमते. त्यांना पिढीजात मिळालेले मनुष्य स्वभावाचे ज्ञान फार उपयोगी पडते.
हजारो वर्षे हीन स्थितीत काढून आता आपण इतरांच्या बरोबर आहोत ही भावना येऊ लागल्याने महारांची या पिढीतील मनोवृत्ती नाजूक आणि भावनाप्रवण असते. पैसे नीट मिळोत किंवा थोडे मिळोत, महार चांगले कपडे घालतो. वंश परंपरेने बळावलेले गुण व नवी परिस्थिती यांचे द्वंद्व त्यांच्यात उत्कटतेने पाहावयास मिळते. महाराष्ट्र राज्याची सीमा ढोबळ मानाने समजून घ्यायची म्हटले तर ‘जिथपर्यंत महार पोहोचला तिथपर्यंत महाराष्ट्र’ अशी म्हण रूढ असलेली आढळते.
खानदेशातील भिल्ल
इरावतीबाईंनी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण तसेच राज्य, राष्ट्र पातळीवर धोरणे ठरवण्यासाठी उपयुक्त असे अभ्यास हाती घेतले होते. त्यांच्या सबंध लिखाणामध्ये मुख्यतः वर्णनात्मक दृष्टिकोन दिसतो, तसेच शास्त्रीय अंगाने केलेल्या त्यांच्या लिखाणात गरजेनुसार ठिकठिकाणी विश्लेषणात्मक तक्ते दिसून येतात.
१९५७-५८ च्या काळात इरावतीबाईंनी भिल्ल आदिवासींचे सर्वेक्षण केले. त्यांच्या मते, आदिवासी भारतीय लोकसंख्येच्या इतर भागांपेक्षा वेगळे नाहीत आणि ‘मूलगामीपणा’च्या आधारे एक नवीन स्वतंत्र गट निर्माण करणे चुकीचे ठरेल. आदिवासींना प्रगती करण्यास आणि समाजात समरस होण्यासाठी मदत केली पाहिजे आणि त्यांच्यावर कोणत्याही बाह्य नियमांची सक्ती करू नये. आदिमत्त्वाची जाणीव निर्माण करून आदिवासींची एक संपूर्ण नवीन ओळख तयार करणे चुकीचे ठरेल, असे त्यांचे मत होते. आदिवासी मुलांना त्यांच्या प्रदेशातील भाषेत शिक्षण दिले पाहिजे, (सुरुवातीला त्यांच्या मातृभाषेत, पण प्रादेशिक लिपीमध्ये, आणि नंतर हळूहळू प्रादेशिक भाषेत परिवर्तन करावे) जेणेकरून ते प्रादेशिक सांस्कृतिक जीवनात सहभागी होऊ शकतील हे मत इरावतीबाईंनी सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीच मांडले होते. आजच्या आपल्या सरकारी शैक्षणिक धोरणामध्ये या गोष्टी नमूद केल्या आहेत, आणि त्यावर अजून बरेच कार्य करायचे आहे, हे इथे नमूद केलेच पाहिजे, ज्यामुळे इरावतीबाईंच्या दूरदृष्टीची थोडीफार कल्पना आपणास येईल.
इरावतीबाई म्हणत –
“एक दिवस असा उगवेल जेव्हा हे एकेकाळचे आदिम विद्वान आपल्या सांस्कृतिक परंपरांवर नवीन प्रकाश टाकतील, आपण जोपासलेल्या एकांगी दृष्टिकोनाचे निराकरण करतील आणि आम्हाला ठोस पुराव्यांसह पटवून देतील की पुरीचा महाजगन्नाथ आणि पंढरपूरचा विठोबा हे भारताच्या आध्यात्मिक वारशाला आदिवासींची देणगी आहेत.’’
इरावतीबाईंच्या विचारसरणीत महाराष्ट्रीय राष्ट्रवादाची जाणीव स्पष्टपणे प्रतिबिंबित होत होती. तरीही, गोंडी किंवा भिली यांसारख्या मोठ्या प्रमाणावर बोलल्या जाणाऱ्या आदिवासी भाषांच्या तुलनेत मराठी भाषेलाच प्रादेशिक भाषेचा दर्जा द्यावा अशी भूमिका इरावतीबाईंनी घेतली नाही. भारतातील, महाराष्ट्रातील विविधता आणि बहुपद्धतींचा त्यांनी समर्थपणे पुरस्कार केला असला, तरीही ही विविधता मान्यताप्राप्त राज्यांच्या आणि त्यांनी अधिकृतपणे दर्शविलेल्या प्रादेशिक संस्कृतींच्या चौकटीत राहावी, असे त्यांचे मत होते.
महाराष्ट्रातील नंदीवाले
बैलाचा उपयोग करून त्या माध्यमातून भविष्य सांगून अथवा इतर काही करमणूक करून पोट भरणारे अशी जमात ‘नंदीवाले’ म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते. १९६० च्या आसपास इरावतीबाईंनी या नंदीवाल्या लोकांच्या समूहाचा सखोल अभ्यास केला. एका ठिकाणाहून दुसरीकडे, किंबहुना एका राज्यातून दुसऱ्या राज्याकडे भटकत विस्थापित होणारी ही जमात नक्की कोणत्या लोकसमूहातून तयार झाली, हे समूह काय कारणांमुळे विस्थापित झाले आणि ते मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कसे होतात या प्रश्नांची इरावतीबाईंनी आपल्या अभ्यासात उकल केली.
नंदीवाले म्हणून ओळखले जाणारे हे लोक भटकत असत, जंगलात राहत, सोबत शिकारी कुत्रे ठेवत. हरीण, डुक्कर, ससे अशा लहानसहान प्राण्यांची शिकार करून खात असत. एखाद्या ठिकाणी ते दोन-तीन महिने राहत आणि अशा वास्तव्यात आपल्या समाजातील लग्नकार्य आणि इतर गोष्टी उरकून पुढील मुक्कामी निघत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या समाजातील लोक त्या काळात व्यवस्थित पैसे मिळवत, त्यातले काही लोक तर इतरांना व्याजाने देखील पैसे देत. आपल्या आईचा अपमान करून तिला शिवीगाळ करणे, हा नंदीवाल्या समाजात खूप मोठा अपराध समजला जाई आणि असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीस शिक्षेखातर बांधून ठेवून तीन दिवस उपाशी ठेवत. मुळात हे तेलगू भाषा बोलणारे लोक आंध्र प्रदेशातून स्थलांतरित झालेले होते. त्या काळी तिथल्या जातीव्यवस्थेनुसार त्यांना सहाव्या क्रमांकाचा दर्जा होता, शेकडो वर्षे महाराष्ट्रात स्थलांतरित होऊन, तिथल्या संस्कृतीशी जुळवून घेऊन त्यांची महाराष्ट्रातील जातीची उतरंड सुधारली, आणि त्यांना तिसऱ्या क्रमांकाचा दर्जा मिळाला.
मुळातच मानववंशशास्त्राचा अभ्यास म्हणजे माणसाचा समाज, संस्कृती, चालीरीती या अंगाने केलेला सखोल अभ्यास. हा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वस्तुनिष्ठ होण्यासाठी अभ्यासकांनी लोकसमूहांत मिसळून काही काळ वास्तव्य केले पाहिजे. या भूमिकेतून इरावतीबाईंनी नंदीवाल्यांचे जीवन समजून घेण्यासाठी आपले दोन विद्यार्थी नंदीवाल्यांच्या एका गटासोबत पाठवले होते. के. सी. मल्होत्रा आणि बी. वी. भानू या विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी तंबूची व्यवस्था केलेली असायची, ते नंदीवाल्या समूहासोबत महिनोंमहिने भटकत राहत. याच अभ्यासातून मल्होत्रा हे इरावतींचे पीएचडी चे पहिले विद्यार्थी म्हणून ओळखले गेले. नंदीवाल्या समाजाविषयी त्यांनी पुढे लेख लिहिले, तसेच शोधनिबंध प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील धनगर
धनगर समाजाविषयी अभ्यास करण्यासाठी इरावतीबाईंनी १९६७ मध्ये फोर्ड फाउंडेशनकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवला. त्याबाबत माहिती मिळताच भारताचे तत्कालीन पंतप्रधान राधाकृष्णन यांनी इरावतीबाईंना अभ्यासासाठी पाच लाख रुपयांची देणगी सरकारकडून मंजूर केली. त्याकाळी ती रक्कम फार मोठी होती. यावरून त्यांच्या स्वातंत्र्योत्तर भारतातील समुदाय अभ्यासाच्या कार्याची महती कळून येते.
धनगर समाजाविषयी इरावतीबाईंचे तत्कालीन निरीक्षण असे :
‘धनगर समाज शेळ्या-मेंढ्या पाळणारा महाराष्ट्रातील प्रमुख भटका समाज आहे. आपला संसार, कुटुंब कबिला बरोबर घेऊन हा समाज भटकत राहतो.
प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील घाट-खोऱ्यांत धनगर समाज भटकंती करताना आढळतो. त्यांच्याबरोबर शेळ्या, मेंढ्या आणि जोडीला एखाद-दोन जंगली कुत्री असतात.
धनगर थोडे काम करतात, थोडे मागून जगतात तर कधीकधी लहानसहान चोऱ्या, लबाड्या करतात.
धनगर समाज खंडोबा देवावर फार श्रद्धा ठेवून जगतो.’