इरावतीबाईंना शिक्षणासाठी परदेशी पाठवण्यास सासरे अण्णासाहेब फारसे उत्सुक नव्हते. मात्र, दिनकर यांच्या पाठिंब्यामुळे त्या जर्मनीमध्ये शिक्षण घेऊ शकल्या. भारतात परत आल्यानंतर, १९३१ च्या सुमारास अण्णासाहेबांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी शिक्षण संस्थेत इरावतीबाई रुजू झाल्या. विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. १९३९ सालापर्यंत, म्हणजे नऊ वर्षे त्यांनी एसएनडीटीमध्ये पदभार सांभाळला.
१९३९ साली इरावतीबाईंना डेक्कन महाविद्यालयात काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी एसएनडीटीशी असलेला करार संपुष्टात आणावा लागणार होता. ठरलेल्या कालावधीच्या आधी करार रद्द केल्यास संस्थेकडून आकारला जाणारा दंड त्यांनी संस्थेत भरावा, अशी भूमिका अण्णासाहेबांनी घेतली. इरावती आपली स्नुषा म्हणून एसएनडीटी शिक्षण संस्थेत काम करत असल्या तरी, संस्थेचे नियम कर्तव्यपरायण अण्णासाहेबांनी त्यांच्यासाठी शिथिल केले नाहीत. परिणामी, इरावतीबाईंना सोन्याच्या बांगड्या विकून दंड भरावा लागला. या बांगड्या त्यांना लग्नात आईकडून मिळाल्या होत्या. साहजिकच त्याबाबत इरावती संवेदनशील होत्या. परंतु मंगळसूत्र, दागिने अशा अलंकारिक गोष्टींत त्यांचे मन फारसे गुंतले नव्हते.
वरकरणी पाहता, अण्णासाहेबांनी आपल्या सुनेला स्वतःच्याच संस्थेत दंड भरायला लावणे ही गोष्ट अचंबित करणारी वाटते. मात्र अण्णासाहेबांनी आयुष्यभर संस्थेच्या कार्यासाठी देणग्या गोळा केल्या, परंतु स्वत:साठी कधीही कुणाकडून पैसे घेतले नव्हते. स्वत:च्या मुलांकडूनही कधी पैसे घ्यावे लागलेच, तर ते परत देऊ करत. एकंदरीत अण्णासाहेबांचे ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्त्व आणि संस्थेप्रती असलेले समर्पण लक्षात घेता, व्यावहारिक दृष्ट्या इरावतीबाईंना संस्थेसाठी दंड आकारणे समर्थनीय आहे.
आपण उभारलेल्या संस्थेतून कित्येक मुलींना परदेशी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देणारे अण्णासाहेब, आपल्या सुनेने मात्र जर्मनीत जाऊन पुढील शिक्षण घेऊ नये, असे मत व्यक्त करतात, ते इरावतीबाईंना क्लेशकारक होते. मात्र मनोमन त्यांना अण्णासाहेबांप्रती प्रचंड आदर होता. त्यांची राहणी अतिशय साधी आणि स्वभाव अबोल असा होता. इरावतीबाईंनी ‘भोवरा’ या आपल्या लघुनिबंध संग्रहात ‘आजोबा’ या लेखात त्यांना समजलेले अण्णासाहेब सहज सोप्या पद्धतीने मांडले आहेत. अत्यंत वाचनीय असा हा लेख आहे. या लेखातून त्यांच्या अण्णासाहेबांविषयीच्या भावनांची देखील जाणीव होते. स्वभावाने भिडस्त, प्रापंचिक आयुष्यात तटस्थ आणि उभारलेल्या कार्याबाबत, तसेच संस्थेबाबत अत्यंत कनवाळू, कर्तव्यदक्ष आणि समाजसुधारक अशा कर्मयोगी अण्णासाहेबांविषयी इरावतीबाई लिहितात,
“ही माणसे माणूसघाणी नव्हेत, पण आपण होऊन ओळख काढणे, भोवतालच्या माणसांशी समरस होणे, ह्यांना जमत नाही. जीवनाच्या शांत, धीम्या प्रवाहात त्यांना भावनांची खळबळ नको असते. आनंदाचा पूर नको, क्रोधाची आग नको; दु:खाचे चटके नको असतात. म्हणून यांचा माणसांशी संपर्क दुरून दुरून असतो. ह्यांच्या सहानुभूतीचा उगम भावनेत नसून बुद्धीवर आधारलेला असतो. प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने कदाचित ही भूमिका फलदायी असेल, पण शेजारी असणाऱ्याला पुष्कळदा असे वाटते की, आपल्या घरी माणूस वावरतो की माणसाची छाया!”
एकदा इरावतीबाई आपल्या अमेरिकन मित्रास स्थितप्रज्ञ शब्दाचा अर्थ समजावून देत होत्या. अशा प्रकारची कुणी व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का, असे मित्राने विचारता त्या म्हणाल्या,
“पाहण्यात काय, माझ्या घरात असे माणूस आहे!” अर्थातच तो उल्लेख अण्णासाहेबांबाबत होता. त्याच लेखात इरावतीबाई पुढे लिहितात, “केवढे माझे भाग्य की मी अशा माणसाची सून झाले. त्याहीपेक्षा महत्तर माझे भाग्य की मी अशा माणसाची बायको झाले नाही.’’
अण्णासाहेबांविषयी अतीव आदर आणि त्याचबरोबर स्त्रीवादी, व्यावहारिक दृष्टिकोनातून उमटलेले इरावतीबाईंचे हे उद्गार म्हणजे, अण्णासाहेबांच्या स्वभावाचे ‘काठावर बसून तटस्थपणे केलेले विश्लेषण’ असे म्हणता येईल.