गौरवर्ण, भारतीय स्त्रियांमध्ये अभावानेच आढळणारी उंची आणि विलक्षण विद्वत्ता यांमुळे इरावतीबाईंचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर सहज पडत असे. मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र या भारतात नव्याने विकसित होणाऱ्या शाखांमध्ये पुरुषांची मक्तेदारी असूनही, त्यांनी आपल्या कार्याने स्वतःचे स्थान निर्माण केले. वैयक्तिक जीवनात त्या स्वतंत्र विचाराच्या होत्या आणि स्वतःच्या विश्वासांवर ठाम राहणाऱ्या होत्या. राहणी अत्यंत साधी आणि विचारसरणी पुरोगामी होती. त्यांचे जीवन पारंपरिक चौकटीत बसणारे नव्हते. त्यांनी वेळोवेळी प्रचलित रूढींना बगल दिली. पतीस ‘अहो’ किंवा तत्सम आदरार्थी शब्दाऐवजी त्या नावाने संबोधत. कर्वे कुटुंबात लग्न झाल्यामुळे सुधारणावादी विचार असणाऱ्या घराण्याशी त्या जोडल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्या पुरोगामी विचारांना अधिक धार आली.
इरावतीबाईंनी विवाहित स्त्रियांशी संलग्न असणाऱ्या मंगळसूत्र, कुंकू आणि बांगड्या यांसारख्या प्रतीकात्मक गोष्टी स्वीकारल्या नाहीत. स्वतः पुरोगामी कुटुंबात असूनही, त्यांना समाजातील स्त्रियांच्या अन्यायकारक स्थितीची जाणीव होती आणि त्या त्याच्या विरोधात उभ्या राहिल्या. चित्पावन ब्राह्मण समाजात जन्मल्यामुळे त्या शाकाहारी होत्या. मात्र, जर्मनीत शिक्षण घेत असताना त्यांनी मांसाहार सुरू केला आणि नंतरही तो कायम ठेवला. ‘बीफ’ (बैलाचे मांस) खाणे हिंदू धर्मात पाप मानले जाते, हा विचारच त्यांना अमान्य होता. त्या काळी ‘गोमांसबंदी’च्या मुद्द्यावर त्यांनी तशी स्पष्ट भूमिका घेतली होती.
इरावतीबाईंचा दिनकर यांच्याशी झालेला प्रेमविवाह त्या काळात रूढीबाह्य होता. त्यांनी स्त्री-पुरुष दोघांनाही जोडीदार निवडण्याचा समान अधिकार असल्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. तत्कालीन पितृसत्ताक समाजाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय क्रांतिकारी होता. त्या दिनकर यांना ‘दिनू’ असे संबोधत आणि दिनकर त्यांना ‘इरु’ म्हणत. विशेष म्हणजे, त्यांची मुलेही आईवडिलांना ‘इरु’ आणि ‘दिनू’ असंच म्हणत. दिनकर यांनी समाजसुधारणा किंवा स्त्री-सक्षमीकरणावर जाहीर भूमिका घेतली नसली, तरी ते आदर्श पती होते. पत्नीची असामान्य बौद्धिक क्षमता ओळखून त्यांनी शिक्षण, संशोधन, प्रवास आणि परदेशगमनासाठी त्यांना सदैव प्रोत्साहन दिले. त्या काळात विवाहित स्त्रियांना पतीशिवाय इतर पुरुष सहकाऱ्यांसोबत प्रवास करण्याची मोकळीक नव्हती. मात्र, दिनकर यांनी इरावतीबाईंना या सर्व बाबतीत पूर्ण पाठिंबा दिला.
१९४० च्या दशकात इरावतीबाई रोज घरून डेक्कन कॉलेजपर्यंत त्यांच्या लॅंब्रेटा स्कूटरवरून जात. त्या स्वयंचलित दुचाकी वाहन चालवणाऱ्या पहिल्या महिलांपैकी एक होत्या. व्यक्तिगत आयुष्यात कुंकू न लावणाऱ्या इरावतीबाई डेक्कन कॉलेजच्या परिसरातून वारकरी पंढरपूरला जात असताना मात्र आवर्जून कुंकू लावून जात आणि ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या राष्ट्रोत्सवांमध्ये झेंडा फडकवतानाही त्या कुंकू लावत. यावरून त्यांच्या सुधारणावादी दृष्टिकोनाबरोबरच सामाजिक परंपरांचे असलेले भानही दिसून येते.
व्यावसायिक जीवनाबरोबरच त्यांचे कौटुंबिक जीवन परिपूर्ण होते. १९३२ साली दिनकर आणि इरावतीबाईंना पहिली कन्या झाली. तिचे नाव जाई ठेवले. १९३६ मध्ये दाम्पत्याला मुलगा झाला, त्याचे नाव आनंद. त्यानंतर १९४२ मध्ये; म्हणजे आनंदच्या जन्मानंतर सात वर्षाने पुन्हा अपत्यप्राप्ती झाली. या कन्येचे नाव गौरी ठेवण्यात आले. तिन्ही मुले त्यांच्या लॉ कॉलेज रोडवरील घरात शिस्तप्रिय वातावरणात मोठी झाली. जाई आणि गौरी यांचे शालेय शिक्षण अहिल्यादेवी हायस्कूल या पुण्यातील मुलींच्या शाळेत झाले तर आनंद कर्वे यांचे शालेय शिक्षण रमणबाग हायस्कूल (आताची न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग) या मुलांच्या शाळेत झाले. तसेच, त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमधून झाले. इरावतीबाईंनी मुलांना लहानपणापासूनच संशोधनाच्या कार्यात सहभागी करून घेतले. त्यामुळे आनंद, जाई आणि गौरी वेगळ्या दृष्टिकोनातून घडली.
१९४४ साली इरावतीबाई संशोधनासाठी गुजरातला गेल्या असताना, त्यांची धाकटी मुलगी गौरी अवघ्या दोन वर्षांची होती. मोठी मुले दहा-बारा वर्षांची होती. त्या काळात दिनकर यांनी मुलांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि पत्नीच्या कार्याला पाठिंबा दिला. त्यामुळेच इरावतीबाईंच्या लेखनात त्यांचे स्थान सखा, पती, जोडीदार आणि मार्गदर्शक अशा भूमिकांमध्ये दिसून येते. ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ (Kinship Organization in India) या संशोधनात्मक ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी ‘दिनकरांच्या पायावर डोके ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले’, असा उल्लेख केला आहे, हे त्यांच्या परस्पर सन्मानाचे प्रतीक आहे.
मुले लहान असताना इरावतीबाईंच्या आई भागीरथी बऱ्याचदा त्यांच्याकडे राहायला येत असत. मुलांना त्यांचा खूप लळा होता. इरावतीबाई आणि त्यांच्या सासूबाई बाया यांच्या नात्यात मात्र कायम तणाव असे. कर्वे कुटुंबाच्या मनाविरुद्ध जर्मनीला गेल्यापासून बाया इरावतीबाईंवर नाराज होत्या. उतारवयात अण्णासाहेब मुलगा दिनकरकडे राहायला आले, परंतु बाया मात्र अण्णासाहेबांच्या हिंगण्याच्या संस्थेत राहिल्या. परांजपे कुटुंबाशी मात्र इरावतीबाई आणि कर्वे कुटुंबाचे कायम जिव्हाळ्याचे संबंध राहिले. मुले रँग्लर परांजपे यांना अप्पा आजोबा म्हणत. इरावतीचे लहानपण परांजपे कुटुंबात गेले होते. लग्नानंतर त्या कर्वे कुटुंबात आल्या. दोन्ही कुटुंबांत नास्तिक वातावरण होते. परंतु इरावतीबाईंनी आपल्या घरी हिंदू सण साजरे केले. त्या सणांकडे धार्मिकतेपेक्षा संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग या दृष्टीने पाहत.
मुलगी जाई हिचा विवाह निंबकर यांच्या घरात झाला. जाई निंबकर यांनी अमेरिकेतील ॲरिझोना विद्यापीठातून समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांत एम.ए. केले. १९५९ पासून त्यांनी लेखनास सुरुवात केली. त्यांच्या साहित्यसंपदेत इंग्रजी-मराठी कादंबऱ्या, इंग्रजी कथासंग्रह, अनेक इंग्रजी-मराठी स्फुट लेख, तसेच परदेशी लोकांसाठी मराठी भाषा शिकवणारी पुस्तके यांचा समावेश आहे. जाई निंबकर यांच्या मदतीने मॅक्सीन बर्नस्टन यांनी फलटण येथे प्रगत शिक्षण संस्था स्थापन केली. त्यांच्या पतींनी आणि मुलींनी निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) ही एक बिनसरकारी स्वायत्त संस्था सुरू केली. त्यांच्या तीन मुली—चंदा, नंदिनी आणि मंजिरी यांनी संस्थेचे कार्य पुढे नेले. इरावतीबाईंचे पुत्र आनंद कर्वे यांनी १९८० सालापर्यंत ‘नारी’ चे संचालकपद सांभाळले. त्यांच्या कारकिर्दीत संस्थेला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली.
पुण्यात जन्मलेले आनंद कर्वे हे सुप्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले. त्यांचे महत्त्वाचे आणि आंतरराष्ट्रीय नाव मिळालेले संशोधन म्हणजे शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी संकरित बियाणाच्या काही जाती विकसित करण्यापासून ते स्वस्त हरितगृहापर्यंत विविध नावीन्यपूर्ण तंत्रे त्यांनी विकसित केली. तसेच, खरकट्या अन्नापासून बायोगॅस निर्मितीचे तंत्र विकसित केले. त्यांच्या ‘आरती’ या संस्थेत काडीकचऱ्यापासून कोळसा बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले, जो प्रियदर्शिनी कर्वे यांचा संशोधन प्रकल्प होता. त्यांनी स्थापन केलेली ॲप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (ARTI - आरती) ही संस्था ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा प्रतिष्ठित ॲश्डेन पुरस्कार २००२ आणि २००६ या दोन वर्षी जिंकणारी पहिली भारतीय संस्था ठरली. ब्रिटन सरकार हा पुरस्कार चिरंतन ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्नशील असलेल्या नावीन्यपूर्ण व लोकोपयोगी प्रकल्पांना प्रदान करते.
इरावतीबाईंच्या कनिष्ठ कन्या गौरी लग्नानंतर मराठीतील नामवंत लेखिका - गौरी देशपांडे म्हणून नावारूपाला आल्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन असे विविध साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. मराठीत जितके लेखन त्यांनी केले, तितकेच इंग्रजीतही केले. तसेच इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी अनुवादही केले. त्यांच्या कन्या उर्मिला देशपांडे आणि ब्राझीलच्या मानववंशशास्त्रज्ञ थियागो पिंटो बार्बोसा यांनी मिळून ‘इरु’ हे इरावती कर्वे यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तक लिहिले, जे अत्यंत प्रसिद्ध झाले.
सुमारे १९६० च्या दशकात अमेरिकेतील वास्तव्यात इरावतीबाईंना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतरही त्या कार्यरत राहिल्या. पुढे, ११ ऑगस्ट १९७० रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी इरावतीबाईंचे हृदयविकाराने झोपेतच निधन झाले.