१९३९ साली इरावती कर्वे यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पदव्युत्तर आणि संशोधन विभागात ‘प्रपाठक’ म्हणून कार्यभार स्वीकारला. कालांतराने त्या विभागप्रमुख व प्राचार्य झाल्या. भारताच्या मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र क्षेत्रातील प्रगतीच्या काळात, इरावती डेक्कन कॉलेजमधील दोन्ही विभागांच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. अखेरपर्यंत या पदावर त्या कार्यरत होत्या. डेक्कन कॉलेजमध्ये रुजू झाल्याच्या वर्षी, म्हणजे १९३९ साली, भारतीय विज्ञान काँग्रेसच्या मानववंशशास्त्र विभागाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या संशोधनाच्या व्यापकतेमुळे आणि लोकसंग्रहामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.
लांघणज हे गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ आहे. इ.स.पूर्व २५०० च्या सुमारास येथील संस्कृती फोफावली होती असे मानले जाते. येथे १९४१-१९६३ या काळात भारतीय पुरातत्त्व विभागाने इथे उत्खनन केले. या उत्खननातून सिंधूपूर्व (Pre-Harappan) संस्कृतीचे अनेक अवशेष मिळाले. लांघणजमधून मिळालेली ठिबक पाण्याची भांडी, दगडी आणि हाडाची साधने, शिक्के, मृत्यूविधीचे पुरावे आणि प्राण्यांच्या हाडांमुळे येथील लोक शिकारीवर आणि अंशतः शेतीवर अवलंबून होते, हे स्पष्ट होते. हे स्थळ सिंधू संस्कृतीच्या आद्य टप्प्याच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
इरावतीबाई डेक्कन कॉलेजमध्ये कार्यरत असताना, संस्कृत विद्वान व पुरातत्त्वज्ञ प्रा. हसमुख सांकलिया पुरातत्त्व विभागाचे प्रमुख होते. १९४१ ते १९६३ या कालावधीत लांघणज येथे अनेक उत्खनने झाली. इरावतीबाई आणि हसमुख सांकलिया यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील उत्खननात महत्त्वाची भूमिका निभावली. या उत्खननात गारगोटीची लहान हत्यारे, दगडी कपचे, धारदार छिलके, हाडे, मृद्भांडी आणि शंख मिळाले. २८ फेब्रुवारी १९४४ रोजी पहिल्यांदा मानवी सापळा आढळला. संशोधनाच्या दृष्टिकोनातून हा पुरावा महत्त्वाचा ठरला. इरावतीबाईंनी जर्मनीत मानवी कवट्या आणि हाडांचा अभ्यास केला असल्याने लांघणज येथे सापडलेल्या अवशेषांचे त्यांना सखोल परीक्षण करता आले. कार्बन-१४ पद्धतीनुसार लांघणज संस्कृती इ.स.पू. २५८५ ते २१५० दरम्यान अस्तित्वात होती, असा निष्कर्ष काढण्यात आला. १९४५-४६ मध्ये त्यांना लंडनच्या रॉयल अँथ्रोपोलॉजिकल संस्थेची एम्सली हॉर्निमन स्कॉलरशिप मिळाली. प्रा. हसमुख सांकलियांच्या सहकार्याने इरावतीबाईंनी भारतीय पुरातत्त्वविद्येमध्ये मानववंशशास्त्रीय संशोधनाची पायाभरणी केली आणि जागतिक दर्जाचे संशोधन घडवले. कोणत्याही संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी तिचा इतिहास, संस्कृती, चालीरीती समजून घेणे आवश्यक असते. या दृष्टिकोनातून त्यांनी मानवांच्या सांस्कृतिक आणि जैविक विविधतेचा अभ्यास करण्यासाठी संख्याशास्त्रीय ‘मल्टी-व्हेरीएट’ पद्धतींचा वापर केला, प्राचीन भारतीय इतिहासाचाही सखोल अभ्यास केला.
संशोधन कार्यासाठी इरावतीबाई गावोगावच्या आदिवासी क्षेत्रात जाऊन विविध जातींतील लोक-समूहांना भेट देऊन त्यांच्या शरीराचे मोजमाप करत. शरीराचे नमुने अभ्यासासाठी गोळा करत. बोटातून नमुन्यासाठी रक्त घेताना ते आदिवासी घाबरत. वस्तुतः आदिवासींना जळवा चावून शरीरावर अनेक जखमा झालेल्या असत. तरीही रक्ताचा नमुना देताना त्यांची घाबरगुंडी उडत असे. इरावतीबाई आपल्या प्रथमोपचार पेटीतून आदिवासींच्या जखमांवर स्पिरिट आणि आयोडीन लावत. जखमांना थोडा आराम मिळाल्यावर त्यांची भीड चेपे आणि हळूहळू ते लोक बोलते होत.
देशाच्या अतिदुर्गम भागांमध्ये अभ्यासासाठी जायचे असल्यास तिथल्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून जीप आणि एक अधिकारी पाठविण्याची विनंती करावी लागे. तरीही व्यावहारिक अडचणींमुळे बरेच अंतर पायी चालत जावे लागे, कधीकधी रात्रीच्या वेळी आदिवासींच्या घरी मुक्कामही करावा लागे.
इरावतीबाई एकदा प्रा. सांकलियांबरोबर लांघणजला उत्खनन आणि संशोधनासाठी गेल्या होत्या. जवळच ‘हिरपुरा’ नामक गाव होते, तिथे काम करण्यासाठी काही मजूर यांच्या चमूत सामील झाले. त्यांच्यातील एक मजूर अनुसूचित जातीचा असल्याने गावातल्या लोकांनी स्वयंपाक बनवून देण्यास नकार दिला. अशा वेळी दिवसभर संशोधन कार्य करून रात्री इरावतीबाई स्वत: आपल्या सहकाऱ्यांबरोबर स्वयंपाक करत.
एकदा आडवाटेवर असणाऱ्या गावी मुक्काम करण्यासाठी सर्वांची एका शाळेत राहण्याची सोय करण्यात आली होती. रात्री उशिरा त्यांचा चमू तिथे पोहोचला. परंतु तो नेमका रविवार असल्याने शाळेच्या खोल्या बंद होत्या. काही स्थानिकांनी त्यांची झोपण्याची सोय जवळच असलेल्या एका मोटार गॅरेजमध्ये केली. तिथे जाऊन पाहिले, तर एक भलामोठा ट्रक गॅरेजमध्ये जागा अडवून उभा होता. अखेर सांकलिया, इरावतीबाई आणि काही सहकारी खाली, तर काहीजण ट्रकमध्ये झोपले आणि मुक्कामाची अडचण दूर झाली. काही वेळा लोक इरावतीबाई, सांकलिया आणि त्यांच्या चमूला सर्कशीत काम करणारे किंवा नाटक करणारे भटके कलाकार समजून मुक्कामाची परवानगी देत नसत.
डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम करत असतानाही इरावतीबाईंचे इतर संशोधन कार्य आणि त्यावरील लिखाण अविरत चालत असे. एखादे काम किंवा लिखाण करत असल्या की त्यात इतक्या गढून जात, की टेबलवर आलेला चहा थंड होऊन गेला आहे, याचेदेखील त्यांना भान राहत नसे.
याच संदर्भातली १९४२ सालची एक गोष्ट. इरावतीबाईंच्या कन्येचा नुकताच जन्म झाला होता. त्या आपल्या कार्यालयात कामात गढून गेल्या होत्या आणि संध्याकाळ केव्हा झाली त्यांना कळलेच नाही. अचानक त्यांना शरीराचा वरचा भाग ओला झाल्याचे जाणवले, जणू अंगावर पाणी पडावे. ओलसरपणाच्या जाणीवेने त्या लिखाणाच्या तंद्रीतून बाहेर आल्या आणि त्यांच्या लक्षात आले, घरी तान्हे बाळ आहे आणि त्याच्या भुकेची वेळ झाल्याने पान्हा फुटला आहे. कामाच्या मग्नतेत आपल्याला बाळाची देखील आठवण राहिली नाही, या विचाराने त्या खजील झाल्या आणि काम आटोपते घेतले.
१९४७ साली दिल्लीत आयोजित राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसच्या मानववंशशास्त्र विभागाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मानही इरावतीबाईंना मिळाला. डेक्कन कॉलेजमध्ये आणि इतर संशोधनात त्यांना प्रा. हसमुख सांकलिया यांच्या व्यतिरिक्त के. सी. मलहोत्रा, वाय. बी. दामले, जाई निंबकर, रणदिवे, रामचंद्र मुटाटकर अशा कुशल सहकाऱ्यांची साथ मिळाली.
१९५३ साली इरावतीबाईंनी ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ (Kinship Organization in India) हा अजरामर ग्रंथ प्रसिद्ध केला. भारतीय समाजव्यवस्थेचा, संस्कृतीचा अभ्यास करायचा तर जाती व्यवस्था, विवाहसंस्था आणि नातेसंबंध यांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे, या विचारातून त्यांनी भारतातील विविध सामाजिक संस्थांचा, संरचनेचा अभ्यास केला. त्या अभ्यासाचे सार त्यांनी या ग्रंथात मांडले. मानववंशशास्त्रात हा ग्रंथ प्रमाण मानला जातो.
१९५९ सालापासून अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात इरावतीबाई दोन वर्षांसाठी अतिथी प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. तिथे त्यांनी विविध संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आणि भारतीय समाजरचनेचे पश्चिमी मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले. त्या काळात इरावती यांच्याबरोबर काम करणारे डॉ. रामचंद्र मुटाटकर यांना एएफएमसी (AFMC - Armed Forces Medical College) येथे वैद्यकीय मानववंशशास्त्रावर व्याख्याने देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे श्रेय इरावतीबाईंना जाते. त्यातूनच भारतात वैद्यकीय मानववंशशास्त्राच्या अभ्यासाला अधिक वाव मिळाला.
१९६१ मध्ये इरावतीबाईंच्या अभ्यासावर आधारित ‘हिंदू समाज – एक विवेचन’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात महाराष्ट्राच्या समाजरचनेवर सविस्तर विवेचन आहे. जाती-जमातींविषयीचे आरक्षणाचे धोरण, हिंदू विवाह कायदा, भाषाविषयक प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मकतेबाबत विश्लेषण केले आहे.
१९६३ मध्ये भारतात परतल्यानंतर, पुणे विद्यापीठात स्वतंत्र मानववंशशास्त्र विभाग सुरू करण्यात इरावतीबाईंनी पुढाकार घेतला. पुढे हा विभाग अधिकृतपणे अस्तित्वात आला.
इरावतीबाईंनी समाजशास्त्रीय संशोधनातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. १९६५ मध्ये इरावती कर्वे आणि श्री. रणदिवे यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण या वाढत्या शहराच्या आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रातील सामाजिक गतीवर अभ्यास केला. एक नव्याने उदयास येत असलेल्या बाजारपेठेचे ठिकाण आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम या अनुषंगाने त्यांनी हा अभ्यास केला. फलटण शहराच्या आसपासच्या २३ गावांचा यात समावेश होता. ही ठिकाणे फलटणपासून सात मैलांच्या क्षेत्रात वसली होती. हा अभ्यास भारतीय शासनाच्या योजना आयोगाच्या संशोधन कार्यक्रम समितीच्या वतीने केला गेला. सरकारनेच त्याचा खर्च उचलला. या अभ्यासाविषयीची माहिती व आकडेवारी १९६१-६२ च्या दरम्यान गोळा केली गेली आणि १९६२ च्या अखेरीस त्याचे विश्लेषण केले गेले.
१९६६ मध्ये इरावतीबाईंनी कोयना धरणग्रस्तांचा अभ्यास करून त्यांच्या समस्यांचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विश्लेषण केले. १९६९ साली त्यांनी कोयना धरणामुळे झालेल्या स्थलांतराचा अभ्यास केला. त्यांच्या मते अशा मोठ्या विकास प्रकल्पांमुळे मूळ रहिवाशांना केवळ आपली जमीनच नव्हे, तर आपला संपूर्ण सामाजिक आधार गमवावा लागतो. विकासाच्या नावाखाली ही माणसे कायमची विस्थापित होतात आणि त्यांना विविध स्तरांवर मोठी किंमत मोजावी लागते. इतकेच नाही, तर स्थलांतरित होणाऱ्या व्यक्तींच्या नातेसंबंधांवर आणि समाजरचनेवर दूरगामी परिणाम होतो.
गाव, कुटुंब, जात आणि सामाजिक संरचना यांची एक विशिष्ट भौगोलिक ओळख असते. विस्थापनामुळे ही ओळख हरवते आणि माणसांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. पुनर्वसनाच्या प्रक्रियेत सर्वांना एकाच ठिकाणी स्थलांतरित केले जाते असे नाही. परिणामी, शेतकरी व त्यांच्या कुटुंबांची वडिलोपार्जित घरे, देवळे, सामाजिक उपक्रम यांचा समूळ विनाश होतो. दिली जाणारी भरपाई बहुधा रोख रक्कम स्वरूपात असते. मात्र, एकरकमी मोठी रक्कम हातात पडण्याची सवय नसल्यामुळे अनेक शेतकरी ही रक्कम लग्न, ऐषआराम वा इतर अल्पकालीन गरजांवर खर्च करतात. त्यामुळे जमिनीच्या मोबदल्यात शक्यतो जमीनच देण्यात यावी, अशी शिफारस इरावतीबाईंनी केली. आपल्या अभ्यासात त्यांनी धरणग्रस्तांचे विस्थापन केवळ आर्थिक भरपाईवर मर्यादित न ठेवता त्यामागील सामाजिक आणि मानवी पैलू अधोरेखित केले. त्यांच्या मते, विस्थापन ही केवळ जागेची नाही तर संपूर्ण जीवनशैलीची पुनर्रचना असते. शासनाने यावर संवेदनशीलतेने विचार करणे आवश्यक आहे.
१९७० साली इरावतीबाईंनी हेमलता आचार्य यांच्याबरोबर दुर्गम भागातील आदिवासी आठवडी बाजारांचा अभ्यास केला. यात त्यांनी बाजारपेठा केवळ आर्थिक व्यवहारासाठी नसून, त्या सांस्कृतिक व सामाजिक संवादाचे केंद्र कशा ठरतात, हे स्पष्ट केले. त्यांचे कार्य समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्राच्या विविध अंगांना स्पर्श करणारे असून, त्यांच्या संशोधनाने भारतीय विद्वत्तेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून दिली.