बी.ए. झाल्यानंतर इरावतीबाईंना एम.ए. करण्याची प्रबळ इच्छा होती. परंतु त्यांनी पुढील आयुष्य सुखी संसारात घालवावे असे करमरकर यांना वाटत होते. इरावतीबाईंनी ते मान्य केले नाही. या निर्णयात परांजपे कुटुंब ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. परांजपे कुटुंबाबरोबर इरावती मुंबईला आल्या आणि त्यांनी समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्रा. डॉ. गोविंद सदाशिव घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चित्पावन ब्राह्मणांची शारीरिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये’ या विषयावर प्रबंध सादर केला आणि १९२८ मध्ये एम.ए. पदवी संपादन केली. हा अभ्यास केवळ महाविद्यालयीन प्रबंध नव्हे, तर इरावतीबाईंसाठी आपल्या मुळाशी जोडणारा संशोधन प्रवास होता.
त्यावेळी मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र विभाग स्थापन होऊन अजून दशकही पूर्ण झाले नव्हते. प्रा. डॉ. घुर्ये विभागप्रमुख होते, त्यांनी समाजशास्त्र विषयात केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली होती. भारतीय जातीव्यवस्था, अनुसूचित जमाती, संस्कृती, नागरीकरण, ग्रामजीवनातील स्थित्यंतरे, भारतीय वेशभूषा, कुटुंब व नातेव्यवस्था, साधू-संत, जनसांख्यिकीय समस्या आणि कुटुंब नियोजन अशा विविध विषयांवर त्यांनी संशोधन व लिखाण केले होते. भारतीय समाजाबाबत त्यांचे चिकित्सक लिखाण सुरू होते. इरावतीबाईंना घुर्ये यांच्याबरोबर काम करण्यासाठी सरकारची ‘दक्षिणा’ शिष्यवृत्ती मिळाली. त्या काळी ही शिष्यवृत्ती अत्यंत प्रतिष्ठित मानली जात असे.
इरावतीबाईंचे पदव्युत्तर शिक्षण त्या काळाचा विचार करता पुष्कळ होते. परंतु, त्यांना चौकटीत बंदिस्त होऊन राहायचे नव्हते. शिक्षण, संशोधन आणि जागतिक क्षेत्रात उंच भरारी घ्यायची होती, त्यासाठी पीएचडी करायची होती. त्या काळात समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र या शाखा अद्याप विकसित होत होत्या, त्यामुळे अभ्यासकांची संख्या अत्यल्प होती. संशोधन साहित्यही मर्यादित होते, तसेच भारतात पीएचडी करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या.
दिनकर कर्वे यांनी इरावतीबाईंना जर्मनीमध्ये जाऊन संशोधन करण्यास प्रवृत्त केले. अर्थात त्यासाठी लागणारा खर्च करण्याची दाम्पत्याची ऐपत नव्हती. जर्मनीमध्ये पोहोचल्यावर इरावतीबाईंना एखादी शिष्यवृत्ती मिळेल याची दिनकर यांना कल्पना होती. परंतु, जर्मनीच्या प्रवासाच्या खर्चाची तजवीज करणे आवश्यक होते. इरावतीबाईंच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक बळ देणे अण्णासाहेबांनाही शक्य नव्हते, परंतु त्यांनी जर्मनीला जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, एवढी दिनकर आणि इरावती यांची अपेक्षा होती. उलटपक्षी अण्णासाहेबांनी इरावतीबाईंना आपल्या महिला विद्यापीठात प्राचार्य म्हणून काम करण्यास सुचवले. सासूबाई बाया यांनी देखील त्यांना जर्मनीला न जाण्याचा सल्ला दिला. पुरोगामी विचारसरणीच्या कर्वे कुटुंबाकडून इरावतीबाईंना हे अपेक्षित नव्हते.
इरावतीबाईंच्या डोळ्यांसमोर वेगळेच स्वप्न होते, शिक्षणाच्या व्यापक संधीचे! त्यांनी अण्णासाहेबांचा प्रस्ताव नाकारला. त्याच वेळी उद्योजक जीवराज मेहता यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली आणि जर्मनीला जाण्याचा मार्ग सुकर झाला. अर्थात, दिनकर-इरावती यांनी ही मदत परतबोलीवरच घेतली होती.
दिनकर यांच्या रूपाने इरावतीबाईंना जणू आयुष्याचा जोडीदार, सखा, पाठीराखा, प्रशंसक गवसला होता! ज्या काळात महिलांनी चूल आणि मूल सांभाळावे हाच शिरस्ता होता, त्या काळात दिनकर यांनी असंख्य अडचणींवर मात करून इरावतीबाईंना जर्मनीला पाठवले. त्यांना अभ्यासात मदत केली, त्यांच्या लेखांचे परीक्षण केले, शक्य तेव्हा त्यांच्याबरोबर प्रवास केला. आपल्या वडिलांच्या महिला सशक्तीकरण आणि शिक्षणाची चळवळ उभी करण्याच्या अफाट कर्तृत्वाचा प्रभाव दिनकर यांच्या कृतीतून दिसत होता. आपल्या पत्नीमध्ये विलक्षण चमक आहे हे दिनकर यांना उमगले होते आणि पुरुषी अहंकार, दुराभिमान, स्पर्धात्मक दृष्टिकोन अशा नकारात्मक भावनांना बगल देऊन त्यांनी इरावतीबाईंना कायम प्रोत्साहन दिले. पत्नीला शिक्षणाची आंतरिक ओढ पूर्ण करण्यास परवानगी देत आहोत, असा कुठलाही पुरुषी अभिनिवेश त्यात नव्हता.
करमरकर आणि कर्वे कुटुंबांचा विरोध पत्करून, दिनकर यांच्या पाठिंब्याच्या बळावर इरावतीबाईंनी अखेर जर्मनीला जाण्याचे निश्चित केले!