१९१६ ते १९२० या चार वर्षांसाठी रँग्लर परांजपे यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नेमणूक झाली. या काळात परांजपे कुटुंब मुंबईला राहायला गेले. इरावतीदेखील कुटुंबाबरोबर मुंबईला गेली. या काळात तिचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. परांजपे कुटुंबाचे जीवन सर्व सुखसोयींनी समृद्ध होते. उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंब हवापालटासाठी महाबळेश्वरला जात असे. १९२० साली मुंबईहून परांजपे कुटुंब पुण्याला परत आले. १९२२ मध्ये मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर इरावतीने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि १९२६ मध्ये बी.ए. ची पदवी मिळवली.
याच सुमारास इरावतीची ओळख कर्वे कुटुंबाशी झाली. महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णासाहेब) हे परांजपे यांचे आतेभाऊ होते. स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य केले होते. परांजपे आणि कर्वे कुटुंबामध्ये घनिष्ट संबंध होते. अण्णासाहेबांनी विधवा विवाह करून सामाजिक सुधारणेचा मार्ग पत्करला होता. त्यासाठी त्यांना मोठा विरोध सहन करावा लागला होता. परांजपे यांच्या घरी त्यांचे आवर्जून येणे-जाणे होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबांतील मुले - शकुंतला, इरावती, शंकर, दिनकर, भास्कर आणि रघुनाथ एकत्र खेळत, वाढत होती, टेनिससारखे खेळ खेळत, दगड-खाणीत साचलेल्या पाण्यात डुंबत असत.
पुढे जाऊन अण्णासाहेबांचे थोरले सुपुत्र रघुनाथ (र.धों. कर्वे) यांनी कुटुंब नियोजन आणि लैंगिक शिक्षण यांवर ठाम भूमिका घेतली. एकंदरीत भारतीय समाजाची त्यावेळची सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक स्थिती पाहता, त्या काळात हे कार्य अत्यंत क्रांतिकारी आणि काळाच्या फार पुढचे होते. साहजिकच समाजाचा प्रचंड मोठा रोष त्यांच्या वाट्यास आला. मुंबईतील विल्सन महाविद्यालयात ते गणिताचे प्राध्यापक होते. त्यांची कुटुंब नियोजन विषयाबाबतची भूमिका महाविद्यालयीन विचारधारेच्या विरोधात होती. त्यामुळे संस्थेने त्यांना नोकरीवरून काढून टाकले.
शंकर कर्वे यांनी इंग्लंडमध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले आणि पुढे ते दक्षिण आफ्रिकेत गेले. दिनकर कर्वे यांचे शिक्षण पुण्यातच झाले. बी.एस्सी. पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना बंगलोरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ची शिष्यवृत्ती मिळाली. जर्मनीच्या लाइपजिग विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रात उच्च शिक्षण घेतले आणि डी. फिल. पदवी संपादन केली. पुण्यात परतल्यानंतर दिनकर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य बनले. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झाले.
दिनकर आणि इरावती यांच्यातील मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विवाहाला करमरकर यांचा विरोध होता. खरे तर, धोंडो केशव कर्वे यांचे समाजकार्य, वैचारिक उंची आणि स्त्रीशिक्षणासाठी वाहिलेले जीवन — या पार्श्वभूमीवर त्यांचे सुपुत्र दिनकर यांच्याशी इरावती यांचा विवाह करमरकर यांना मान्य नसणे, हे अनाकलनीय वाटते. परंतु, करमरकरांचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता. त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते स्थैर्य — विशेषतः आर्थिक स्थैर्य. कर्वेंनी घेतलेला समाजहिताचा वसा, उभारलेल्या संस्था हे सर्व प्रेरणादायी होते, परंतु ते सर्व देणगीवर अवलंबून होते. कर्वे कुटुंबीयांच्या नोकऱ्या त्यांच्या सामाजिक भूमिकांमुळे धोक्यात आलेल्या होत्या आणि हे सर्व समाजाला ज्ञात होते. इतकेच नव्हे, तर बाया कर्वे यांनी मुलांच्या शिक्षणासाठी धान्याच्या व्यापाऱ्यांकडून कर्ज घेतले, ही बाबही चर्चेचा विषय होती. त्यामुळे करमरकर यांना घराच्या आर्थिक ताकदीबाबत शंका असणे साहजिक होते. मात्र इरावती ठाम होती. तिच्या मनात दिनकरविषयी प्रेम होते आणि विश्वासही होता. दिनकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या नात्याने आकार घेतला होता — एक परिपक्व, विचारशील प्रेम. या प्रेमाला रँग्लर परांजपे यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीचा भक्कम पाठिंबा होता.
१९२६ साली इरावती व दिनकर विवाहबद्ध झाले. तो केवळ वैयक्तिक नव्हे, तर सजग विचारांनी घडलेल्या दोन कुटुंबांचा संयोग होता. रँग्लर परांजपे यांनी फक्त पाठिंबा दिला नाही, तर नवविवाहित जोडप्याला एक हजार रुपयांची मदत करून आर्थिक आधार दिला. ही रक्कम त्यावेळी फार मोठी होती. त्या मदतीने इरावती व दिनकर यांनी आपल्या संसाराची सुरुवात केली.