“एकाच धर्माचा किंवा संस्कृतीचा आग्रह का? सगळेच राहिनात! कोणी कोणावर जुलूम केला नाही, म्हणजे झालं! माझे अनेक-दैवतवादी मन परस्पर-सहिष्णुतेसाठी, साध्या माणुसकीसाठी हळहळते आहे”
... इरावती कर्वे
“एकाच धर्माचा किंवा संस्कृतीचा आग्रह का? सगळेच राहिनात! कोणी कोणावर जुलूम केला नाही, म्हणजे झालं! माझे अनेक-दैवतवादी मन परस्पर-सहिष्णुतेसाठी, साध्या माणुसकीसाठी हळहळते आहे”
... इरावती कर्वे
इरावती कर्वे या विसाव्या शतकातील भारतातील एक अग्रगण्य समाजशास्त्रज्ञ व मानववंशशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे कार्य भारतीय समाज, संस्कृती, कुटुंबव्यवस्था व नातेसंबंध आणि मानवी विविधता समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी केवळ शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातच नव्हे, तर तत्कालीन सामाजिक आणि राजकीय विचारांवरही आपला ठसा उमटवला, संशोधनात्मक लेखनाशिवाय ललित लेखनदेखील केले. ‘युगांत’ या त्यांच्या महाभारतावरील लेखांच्या संग्रहाला १९६८ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
१५ डिसेंबर १९०५ रोजी ब्रह्मदेशातील (आताचा म्यानमार) म्यिंज्यान (Mingyan) येथे इरावती यांचा जन्म झाला. ब्रह्मदेशात वाहणाऱ्या ‘इरावड्डी’ नदीवरून त्यांचे नाव ‘इरावती’ ठेवण्यात आले. त्यांचे वडील गणेश हरी करमरकर हे पुण्यातील चित्पावन ब्राह्मण कुटुंबातले. इंग्रजांच्या ब्रिटीश बर्मा कॉटन कंपनीतर्फे कुटुंबासह ते म्यानमार येथे स्थायिक झाले. इरावती लहानपणापासूनच चौकस बुद्धीच्या होत्या, त्यांना शिकण्याची तीव्र ओढ होती. म्यानमारमध्ये शिक्षणाची चांगली सोय नसल्याने, करमरकरांनी लहानग्या इरावतीला पुण्याच्या हुजूरपागा शाळेत शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.
१९११ साली, अवघ्या सहाव्या वर्षी इरावती पुण्यात दाखल झाल्या. सुरुवातीला त्या नवीन वातावरणात रुळायला त्यांना वेळ लागला. याच दरम्यान सुप्रसिद्ध गणितज्ञ आणि फर्ग्युसन कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे लक्ष इरावतीकडे गेले. एवढ्या लहान वयात आई-वडिलांपासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या इरावतीला त्यांनी आपल्या घरी, स्वतःच्या मुलीसारखे वाढवण्याचा निर्णय घेतला. परांजपे कुटुंबीयांच्या रूपाने इरावतीला मोठा आधार मिळाला. परांजपे यांचे घर विद्वत्तेचे आणि आधुनिक विचारांचे माहेरघर होते. नास्तिक विचारसरणीबरोबरच घरात श्लोक पठण आणि इंग्रजी साहित्याचे वाचनही चालत असे. या वातावरणाचा इरावतीवर सखोल परिणाम झाला. परांजपे यांच्या विचारांमुळे आणि त्यांच्या घरी येणारे विचारवंत, न्यायाधीश, समाजसुधारक यांच्याशी होणाऱ्या संवादातून इरावती यांच्या विचारांना दिशा मिळाली.
१९२० साली शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर इरावती यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून १९२६ मध्ये बी.ए. ची पदवी मिळवली. याच काळात महर्षी धोंडो केशव (अण्णासाहेब) कर्वे यांचे पुत्र दिनकर कर्वे यांच्याशी त्यांची ओळख झाली. परांजपे व कर्वे कुटुंबीयांमध्ये जिव्हाळ्याचे नातेसंबंध होते. दिनकर आणि इरावती यांच्या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कर्वे कुटुंबाची आर्थिक स्थिती सामान्य होती आणि त्यांच्या सामाजिक भूमिकांमुळे कुटुंबीयांना नोकऱ्या मिळणे अवघड होत असे. त्यामुळे करमरकर यांचा या विवाहाला विरोध होता. मात्र, इरावती आपल्या निर्णयावर ठाम होत्या. रँग्लर परांजपे यांनी मात्र या विवाहाला पाठिंबा दिला, नवविवाहित जोडप्याला आर्थिक मदतही केली आणि १९२६ साली इरावती व दिनकर विवाहबद्ध झाले.
बी.ए. झाल्यानंतर इरावतीबाईंना एम.ए. करायचे होते, परंतु त्यांनी संसारात स्थिरावलेले करमरकर यांना पाहायचे होते. वडिलांचा विरोध असूनही त्या मुंबई येथे प्रा. डॉ. गोविंद सदाशिव घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊ लागल्या. त्यांना संशोधन करण्यासाठी प्रतिष्ठित ‘दक्षिणा’ शिष्यवृत्ती मिळाली. ‘चित्पावन ब्राह्मणांची शारीरिक, सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये’ या विषयावर प्रबंध सादर करून १९२८ मध्ये इरावतीबाईंनी एम.ए. ची पदवी संपादन केली. पुढे त्यांना पीएचडी करण्याचीही प्रबळ इच्छा होती. मात्र त्या काळी भारतामध्ये पीएचडीसाठी आवश्यक व्यवस्था नव्हत्या. त्यामुळे, आर्थिक परिस्थिती अनुकूल नसतानाही पती दिनकर यांनी इरावतीबाईंना जर्मनीला जाऊन संशोधन करण्यास प्रवृत्त केले. करमरकर आणि कर्वे कुटुंबीयांचा त्यास विरोध होता. अण्णासाहेबांनी आपल्या महिला विद्यापीठात प्राचार्य म्हणून काम करण्यासही त्यांना सुचवले होते. मात्र, पतीचा ठाम पाठिंबा आणि दैवयोगाने उद्योजक जीवराज मेहता यांनी देऊ केलेली आर्थिक मदत यांमुळे इरावतीबाईंचा जर्मनीचा मार्ग सुकर झाला.
जून १९२७ मध्ये, पीचडी करण्यासाठी इरावतीबाई मुंबई बंदरातून जर्मनीला निघाल्या. एकीकडे जर्मनीच्या बर्लिन शहराची विशालता, भव्य वास्तुकला आणि दुसरीकडे तिथली गलिच्छ वस्ती, बेरोजगारी, युद्धात जखमी झालेले भिकारी असा विरोधाभास त्यांच्या नजरेस पडला. जर्मन लोकांमधील ज्यूंबद्दलचा द्वेषही त्यांना जाणवला. बर्लिनमधील फ्रेडरिक विल्हेम विद्यापीठात त्यांच्या पीएचडीच्या संशोधनास सुरुवात झाली. त्या काळात जर्मनीत नाझी विचारसरणीचा उदय होत होता आणि युजेनिक्स (शुद्ध वंशसंवर्धन) हा विषय केंद्रबिंदू बनला होता. इरावतीबाईंना ऑयगेन फिशर यांच्यासारखे प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ आणि युजेनिस्ट मार्गदर्शक म्हणून लाभले. युजेनिक्सला पुष्टी देण्यासाठी फिशर यांनी वंश आणि कवटीच्या संबंधाबाबत इरावतीबाईंना संशोधन करण्यास दिले. त्यासाठी त्यांना विविध वंशांच्या कवट्यांचे मोजमाप घ्यावे लागले. मात्र, या संशोधनातून फिशर यांचे युरोपियन वंशाच्या बुद्धिमत्तेबाबतचे गृहीतक चुकीचे असल्याचे सिद्ध झाले. त्यांचे निष्कर्ष नाझी विचारसरणीच्या विरोधात जात असल्याने फिशर अस्वस्थ झाले. परंतु तरीही इरावतीबाईंना १९३० मध्ये पीएचडी पदवी मिळाली. त्यांचे हे कार्य मानववंशशास्त्राच्या इतिहासात क्रांतिकारक मानले जाते. त्यांची पीएचडी पूर्ण झाली तेव्हा दिनकरही जर्मनीला आले आणि काही काळ जर्मनीमध्ये वास्तव्य केल्यानंतर दोघे भारतात परतले.
१९३१ च्या सुमारास अण्णासाहेबांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी (SNDT) शिक्षण संस्थेत इरावतीबाई रुजू झाल्या आणि १९३९ पर्यंत त्यांनी कुलसचिवपदाची जबाबदारी सांभाळली. पुढे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. एसएनडीटी बरोबर असलेला करार वेळेआधी संपुष्टात आणल्याने अण्णासाहेबांनी त्यांना नियमानुसार दंड आकारला. इरावतीबाईंनी आपल्या लग्नातील सोन्याच्या बांगड्या विकून तो भरला.
१९३९ मध्ये इरावतीबाईंनी डेक्कन कॉलेजच्या पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेत ‘प्रपाठक’ म्हणून कार्यभार स्वीकारला आणि कालांतराने त्या विभागप्रमुख आणि प्राचार्य झाल्या. त्या डेक्कन कॉलेजमधील मानववंशशास्त्र व समाजशास्त्र या दोन्ही विभागांच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी अखेरपर्यंत या पदावर काम केले.
पुरातत्त्वज्ञ प्रा. श्री. हसमुख सांकलिया यांच्या सहकार्याने इरावतीबाईंनी डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्व संशोधनाचा पाया घातला. गुजरातच्या लांघणज येथील उत्खननात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. या उत्खननातून मध्याश्मयुगीन संस्कृतीचे पुरावे मिळाले आणि इरावतीबाईंनी जर्मनीत केलेल्या कवटीच्या अभ्यासाचा उपयोग करून मानवी अवशेषांचे परीक्षण केले. त्यांच्या कार्यामुळे भारतीय पुरातत्त्वविद्येत मानवंशशास्त्रीय संशोधनाची पायाभरणी झाली. त्यांनी आपल्या संशोधन कार्यासाठी दुर्गम भागात प्रवास केला. आदिवासी आणि विविध जातींच्या लोक-समूहांना भेटून त्यांचे शारीरिक मोजमाप घेतले, नमुने गोळा केले. त्यांच्या कार्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. इरावतीबाईंनी १९३९ आणि १९४७ साली भारतीय विज्ञान काँग्रेसच्या मानववंशशास्त्र विभागाचे अध्यक्षपद भूषवले.
इरावतीबाईंचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे भारतीय समाजाचा अभ्यास. त्यांनी भारतीय समाजव्यवस्था व संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी जाती व्यवस्था, विवाहसंस्था आणि नातेसंबंधांचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासाचे सार त्यांनी १९५३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ (Kinship Organization in India) या ग्रंथात मांडले. हा ग्रंथ सामाजिक मानववंशशास्त्रात मूलभूत मानला जातो. त्यांनी भारतातील विविध भागांतील लोकसमूहांच्या नातेसंबंधांचे विश्लेषण भाषिक प्रदेशांशी जोडून केले. तसेच, संयुक्त कुटुंबसंस्था आणि जातीय व्यवस्था या भारतीय समाजव्यवस्थेच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला. केवळ पुस्तकी अभ्यास न करता त्यांनी क्षेत्रीय कामावर जोर दिला. त्यासाठी त्यांनी विविध लोकसमूहांचा सखोल अभ्यास केला, ज्यात महाराष्ट्रातील महार, खानदेशातील भिल्ल आणि धनगर यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील महार समुदायाचे तत्कालीन परिस्थितीचे सखोल आणि समर्पक वर्णन त्यांनी केले. त्याचबरोबर, भिल्ल आदिवासींच्या अभ्यासातून आदिवासींना समाजापासून वेगळे न मानता मुख्य प्रवाहात आणण्याचे विचार मांडले.
१९६१ मध्ये इरावतीबाईंनी ‘हिंदू समाज – एक विवेचन’ हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथात त्यांनी महाराष्ट्राच्या समाजरचनेचे विश्लेषण आणि जाती-जमातींविषयीचे आरक्षणाचे धोरण, हिंदू विवाह कायदा, भाषाविषयक प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मकता यांबाबत आपले विचार मांडले. आरक्षणाने जातीनिष्ठ एकत्रीकरण होऊन अलगपणा कायम राहतो आणि राष्ट्रीय एकात्मतेस बाधा येते, असे त्यांचे मत होते. त्यांनी जातीला एक स्वजाती विवाहपद्धती गट (Endogamous Kinship Group) म्हटले आणि त्यातील अंतर्विवाही पोट गटांना ‘पोटजात’ म्हणून ओळखण्याची मांडणी केली.
तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थितीवरही इरावतीबाईंनी भाष्य केले. भारतासारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देशात विविधता स्वीकारणे आणि सहिष्णुता जपणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. त्यांनी भारतीय समाजाची तुलना गोधडीशी केली. त्यांच्या मते, ठिगळे जोडून गोधडी तयार केली जाते तसे विविध समुदाय एकत्र मिसळून एकसंध भारतीय समाज निर्माण झाला आहे.
इरावतीबाईंच्या ललित लेखनातून त्यांचे विचार आणि निरीक्षणे सहजपणे व्यक्त होतात. महाभारताचा मानववंशशास्त्रीय अभ्यास करून त्यांनी ‘युगांत’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी महाभारतातील पात्रांची नैतिक चिकित्सा न करता, त्यांच्या आयुष्यातील घटनांचे विश्लेषण करून मानवी भावनांची उकल केली. भीष्म, युधिष्ठिर आणि कृष्णाच्या काही कृतींवर टीकाही केली. ‘युगांत’ला १९६८ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
इरावतीबाईंचा स्त्रीवादी दृष्टिकोन त्यांच्या लिखाणातून प्रतीत होत असला तरी त्यांनी स्वतःला कधी ‘स्त्रीवादी’ म्हटले नाही. त्यांनी कुटुंबव्यवस्था, विवाहप्रथा आणि वारसा प्रणालींमध्ये महिलांची स्थिती मांडली. बालवयात मुलींना पतीच्या घरी पाठवणे हे सामाजिक नियंत्रणाचे साधन असल्याचे म्हटले. सीतेला अग्निपरीक्षा देण्यास भाग पाडल्याबद्दल रामावर टीका केली आणि राम देव म्हणून का मानावा असा प्रश्न उपस्थित केला.
इरावतीबाईंची राहणी अत्यंत साधी असली तरी वृत्ती पुरोगामी होती. त्यांनी मंगळसूत्र, कुंकू यांसारख्या प्रतीकात्मक गोष्टी स्वीकारल्या नाहीत. पती दिनकर यांना त्या नावाने संबोधत आणि त्यांची मुलेही त्यांना ‘इरू’ आणि वडिलांना ‘दिनू’ असे संबोधत. दिनकर यांनी पत्नीच्या कार्याला कायम पाठिंबा दिला, संशोधन, प्रवास यांसाठी प्रोत्साहन दिले. स्कूटर चालवणाऱ्या देशातील पहिल्या महिलांपैकी त्या एक होत्या. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनाचा योग्य समतोल त्यांनी साधला होता. इरावतीबाई जेव्हा प्रवासाला जात तेव्हा त्यांच्या आई मुलांसाठी घरी येऊन राहत असत. जाई, आनंद आणि गौरी या त्यांच्या मुलांनीही लेखन, संशोधन, विज्ञान या क्षेत्रांत यश मिळवले.
महाराष्ट्राच्या आणि एकूणच भारतीय सामाजिक, बौद्धिक क्षेत्रात इरावती कर्वे यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या संशोधनाची ऐतिहासिक माहिती अबाधित आहे.
मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र आणि भारतीय संस्कृती यांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या इरावती कर्वे या विदुषीचे दिनांक ११ ऑगस्ट १९७० रोजी, वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयविकाराने दुःखद निधन झाले.